scorecardresearch

रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के घट; हरभरा, गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल

कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्यारितीने येणारे म्हणून पर्जन्यछायेच्या प्रदेशातील सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यांत ज्वारी हे शेतकऱ्यांचे लाडके पीक होते.

|| सौरभ कुलश्रेष्ठ

हरभरा, गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल

मुंबई : राज्यातील ज्वारी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक. कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्यारितीने येणारे म्हणून पर्जन्यछायेच्या प्रदेशातील सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यांत ज्वारी हे शेतकऱ्यांचे लाडके पीक होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यातील ज्वारीचे क्षेत्र सरासरीपेक्षा ६ लाख हेक्टरने म्हणजेच ३२ टक्क्यांनी तर गेल्या वर्षीपेक्षा ३ लाख हेक्टरने म्हणजेच १५ टक्क्यांनी घटले आहे. त्याऐवजी कांदा, गहू आणि हरभरा या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळले आहेत.  राज्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र ५१ लाख १९ हजार ८९८ हेक्टर आह़े  यंदा ५७ लाख ३१ हजार १८९ हेक्टरवर रब्बीची पिके येत आहेत. रब्बीचे क्षेत्र वाढले असताना रब्बी ज्वारी या प्रमुख पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे. रब्बी ज्वारीचे राज्यातील २०१४-१५ ते २०१८-१९ या चार वर्षांतील सरासरी क्षेत्र २० लाख २७ हजार २५८ हेक्टर आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांत ज्वारीच्या क्षेत्रात घट होऊ लागली आहे. गेल्या वर्षी १६ लाख ३४ हजार ६२६ हेक्टपर्यंत ज्वारीचे क्षेत्र खाली आले. यंदा त्यात आणखी ३ लाख हेक्टरची घट होऊन १३ लाख ९० हजार ७५३ हेक्टरवर रब्बी ज्वारी घेतली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा विचार करता रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात १५ टक्के तर सरासरीचा विचार करता ३२ टक्के घट झाली आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटत असताना गव्हाचे क्षेत्र सरासरीपेक्षा २२ टक्के, मक्याचे क्षेत्र २८ टक्के, हरभरा ५६ टक्के, तीळ १६ टक्के वाढले आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर असूून यंदा १० लाख ७४ हजार ९३१ हेक्टरवर गहू घेतला जात आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ६३ हजार ८९६ हेक्टर असून यंदा ३ लाख ३८ हजार ८५२ हेक्टरवर मका घेतला जात आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १७ लाख ४३ हजार २५९ हेक्टर होते ते आता २४ लाख ८० हजार ५४९ हेक्टर झाले आहे. तिळाचे सरासरी क्षेत्र १६३० हेक्टर होते. पण यंदा १८९३ हेक्टरवर तीळ घेतला जात आहे.

कारण काय?

’कमी पाऊस असल्यास रब्बीत शेतकरी ज्वारीला पसंती देतात.

मात्र, गेल्या दोन वर्षांत खरीपाच्या शेवटच्या दिवसात सप्टेंबरमध्ये व नंतरही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली.

’ज्वारीच्या तुलनेत पाणी जास्त लागणारे व उत्पन्नही जास्त देणारे गहू, कांदा, ऊससारखे पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले.

’त्याचाही परिणाम रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी होण्यात व इतर पिकांचे क्षेत्र वाढण्यात झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rabbi sorghum area down 32 percent from average farmers gram wheat akp

ताज्या बातम्या