मुंबई: राज्यातील बांधकाम उद्योगाकडून सामान्य लोकांची घर खरेदीत फसवणूक होऊ नये यासाठी या उद्योगावर लक्ष ठेवणाऱ्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणावर (महारेरा) सदस्य पदावर आपली वर्णी लागावी यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.

प्राधिकरणात रिक्त होणाऱ्या सदस्याच्या एका जागेसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आणि माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह सात माजी सनदी अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. महारेराचे सदस्य बिजय सतबीर सिंह यांचा कार्यकाल येत्या जुलैमध्ये संपणार असून ही जागा भरण्यासाठी गृहनिर्माण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बांधकाम उद्योगावर नियामक म्हणून महारेरा महत्त्वाचे मानले जात असून सदस्य होण्यासाठी कुंटे, काकाणी, पाठक यांच्यासह संजय चहांदे, शाम लाल गोयल, बलदेव सिंह यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांनी महारेरावर पाच वर्षे काम करण्याची संधी मिळत असल्याने अर्ज दाखल केला आहे. काकाणी आणि पाठक शुक्रवारी सेवानिवृत्त होत आहेत.