स्वयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू राधे माँ हिला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाणार आहे. विवाहितेचा हुंडय़ासाठी शारिरीक आणि मानसिक छळ तसेच मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
निक्की गुप्ता हिने सासरच्या मंडळीविरोधात हुंडय़ासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात केली होती. राधे मॉं हिच्या सांगण्यावरून हा छळ होत असून तिनेही मारहाण केल्याचा निक्की हिने तक्रारीत म्हटले आहे. कांदिवली पोलिसांनी गुप्ता कुटुंबीयांसह राधे माँवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आम्ही फिर्यादी महिलेसह तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी केली जाणार आहे. राधे माँ या प्रकरणातील सात क्रमांकाची आरोपी असून तिचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.