स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे मॉंची गुरूवारी कांदिवली पोलीस ठाण्यात तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली. हुंडय़ासाठी छळ आणि मारहाण केल्याचा तिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याशिवाय अंधश्रद्धेचा प्रसार, अश्लिल कृत्य आणि फसवणुकीचाही आरोप तिच्यावर आहे. आपल्या चौकशीत सामान्य कुटुंबातून राधे मॉंचा झालेला प्रवास तिने उलगडला. पण फिर्यादी निक्की गुप्ताला ओळखत नसल्याचा दावा तिने केला.
निक्की गुप्ता या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलीस ठाण्यात स्वंयघोषित आध्यात्मिक गुरू राधे मॉंसह सात जणांवर गुन्हा दाखल आहे. तिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही बजावले होते. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राधे मॉं कांदिवली पोलीस ठाण्यात हजर झाली. पहिल्या मजल्यावर तिची चौकशी करण्यात आली. बोरीवली पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात अंधश्रद्धा पसरवणे, अश्लिल कृत्य करणे आणि फसवणूक करणे आदी आरोप असलेले दोन अर्ज आले होते. त्यामुळे कांदिवली पोलिसांबरोबरच बोरीवली पोलिसांनीही तिची चौकशी केली. पोलिसांनी तिच्यासाठी दोन दिवसांपूर्वीच ७५ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली होती. तिने चौकशीत सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्यासोबत तिची शिष्या छोटी मॉं आणि तिचा वकील हजर होता. निक्की गुप्ताला ओळखत नसल्याचा दावा तिने केला. आपल्याकडे अनेक भक्त येत असतात. त्यावेळी तिची एक दोनदा भेट झाल्याचे तिने सांगितले. आपल्यावरील सर्व आरोपीही तिने फेटाळल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा सर्व जबाब व्हिडियो कॅमेऱ्याद्वारे चित्रित करून ठेवण्यात आला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राधे मॉं पोलीस ठाण्यातून बाहेर पडली. उच्च न्यायालयाने तिला दोन आठवडय़ांचा अंतरिम जामिन दिल्यानंतर तिला दर आठवडय़ाच्या बुधवारी पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार आहे.

अशी बनली राधे मॉं.
मला शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मी लहानपणापासून देवळात जाऊन बसायचे. त्यातून मला दैवी शक्ती मिळाल्याचे तिने सांगितले. वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाले. पण नंतर तीन वर्षांत संसार मोडला असेही ती म्हणाली. तेव्हापासून आध्यात्मिक सेवेला वाहून घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले.