कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे गोत्यात आलेल्या वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँने स्वतःवरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा केला आहे. ‘जिसका नाम है, वही बदनाम है’ अशा फिल्मी अंदाजात राधे माँने मुंबईत परतल्यावर प्रतिक्रिया दिली.
जे माझ्या विरोधात कटकारस्थानं करत आहेत. जे रावणासारखे वागत आहेत त्यांचा विनाश अटळ आहे. माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल तर त्याबाबत मला काहीही माहित नाही. ईश्वराच्या नजरेत मी निर्दोष आहे, अशी प्रतिक्रिया तिने एका वृत्त वाहिनीसमोर दिली. तसेच, तिच्यावर असलेल्या आरोपांसंबंधी विचारले असता ‘जिसका नाम है, वही बदनाम है ‘ अशा फिल्मी अंदाजात तिने प्रतिक्रिया दिली.
निक्की गुप्ता या युवतीने सासरच्या मंडळीविरोधात हुंडय़ासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात केली होती. त्याच तक्रारीत राधे माँ यांचा देखील उल्लेख आहे. कांदिवली पोलिसांनी गुप्ता कुटुंबीयांसह राधे माँवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.  त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी केली जाणार आहे. राधे माँ या प्रकरणातील सात क्रमांकाची आरोपी असून तिचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.