कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर १२ जण जखमी झाले आहेत. या दुःखद घटनेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मराठीतून ट्विट करण्यात आला आहे.

‘मुंबई येथील कमला मिल आग दुर्घटनेत भीषण आग लागून लोकांना त्यांचे प्राण गमावावे लागले ही दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या दुःखात मी सहभागी आहे’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात काहीही घडले तरीही त्याचे पडसाद देशभरात उमटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पीडितांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते.

यातील १४ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले. तर काहींना वेळीच बाहेर पडता आल्याने ते बचावले आहेत. घटनेच्या वेळी बारमध्ये एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती, असे समजते. आग नेमकी कशामुळे आग लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. लाकडी फर्निचर, प्लास्टिक आणि बांबू यामुळे आग पसरत गेली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.