मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर २२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

स्थानिक न्यायालयाकडून बजावण्यात आलेले समन्स १२ जुलै २०२१ला मिळेपर्यंत आपल्याला या तक्ररीविषयी काहीच माहीत नसल्याचा दावा राहुल यांनी याचिकेत केला आहे.

भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी २०१९ मध्ये राहुल यांच्याविरोधात गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. गिरगाव न्यायालयाने केलेली ही कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याचिकेवर निर्णय देईपर्यंत गिरगाव न्यायालयाने सुरू केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मानहानी प्रकरणी कारवाईची मागणी केवळ बदनामी झालेली व्यक्तीच करू शकते, असा दावाही राहुल यांनी याचिकेत केला आहे.