मुंबई: काँग्रेसकडून पक्षबांधणीवर भर दिला जात असून जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षणासाठी १० दिवसांचे शिबीर नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. २४ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या या शिबिराला स्वत: काँग्रेसनेते राहुल गांधी उपस्थित राहून जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत.
‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दृष्टी आणि दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही संवादात महत्त्व दिले जाणार आहे.

राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक आणि तज्ज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉररूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार असून सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची प्रशिक्षण टीम प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.

झेन झीच्या आंदोलनाचा प्रभाव

झेन झीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाचा प्रभाव सर्वच राजकीय पक्षांवर दिसत असून काँग्रेसकडूनही या शिबिरात ‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या विषयाला धरून प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करताना जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या चारही बाबी विकसित करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून केला जाणार आहे. प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होतील, ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरही या प्रशिक्षणात भर देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.