स्वच्छ भारत बोलणे आणि प्रत्यक्षात स्वच्छ करणे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचा टोमणा मारत मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार येथील कचराभूमीचा प्रश्न पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून सोडवला पाहिजे, अशी मागणी केली. कचराभूमीला लागणारी आग आणि प्रदूषणामुळे एका मुलाचा जीव गेला असल्याचे सांगत यामुळे अनेक मुलांना क्षयरोग झाल्याचेही राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी देवनार येथील कचराभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस काही आमदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. सोमवारी नागपूरमध्ये आल्यावरच राहुल गांधी यांनी मंगळवारी आपण देवनार कचराभूमीला भेट देणार असल्याचे सांगितले होते.
देवनार कचराभूमीतील मोठय़ा ढिगाऱ्याला २७ जानेवारीला आग लागली व त्यानंतर हे क्षेत्र धुमसतेच आहे. एखाद दिवसाआड कोणत्या तरी भागात आग लागत असल्याने देवनारजवळ अग्निशमन दलाची एक गाडी कायम तैनात ठेवली गेली आहे.
आयुष्यभर ज्या मनुवादाविरोधात घटनाकार डॉ. आंबेडकरांनी लढले त्याच मनुवादाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व संघाचे लोक करीत असून देशातील दलित, आदिवासींचा, तसेच गरिबांचा आवाज दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी नागपूरमधील सभेत केली होती. देशात आरक्षण आणि शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले होते.

Story img Loader