मुंबई : जानेवारीमध्ये पार पडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यापासून रोखल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या आप, जनता दल व सपाने तक्रारी केल्या होत्या. त्याला दोन महिने उलटूनही राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला नाही. निवडणुकीचे मुख्य निरीक्षक व तत्कालीन गृहसचिव इक्बालसिंग चहल यांनी निवृत्तीपूर्वी त्या घटनेचा अहवाल दिला नसल्याची सबब सांगत निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांवरील कारवाईस टाळाटाळ करत आहे.

कुलाबा येथील ‘ए’ विभाग कार्यालयात ३० डिसेंबर रोजी सदर घटना घडली होती. येथील तीन प्रभागांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे बंधु, वहिनी आणि जवळच्या नातेवाईक हे नगरसेवकपदाचे भाजपचे तीन उमेदवार होते. पैसे भरुन टोकन घेतले असताना विरोधी पक्षाच्या १५ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नाकारले होते. त्याचा ठपका नार्वेकर यांच्यावर आला होता. त्याची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली होती. याप्रकरणी नार्वेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी ठाकरे शिवसेना व काँग्रेसने केली होती. आयोगाने पालिका आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवले होते.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अहवालामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती ‘प्रशासकीय दृष्ट्या अनुचीत’ असल्याचे नमूद आहे. आयोगाने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सदर प्रकरण मुख्य निवडणूक निरीक्षक इक्बालसिंग चहल यांच्याकडे पाठवले. चहल तेव्हा गृह विभागाचे अपर मुख्य सचिव होते. दरम्यान चहल ३० जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यानंतर चहल यांना मुंबई पोलीस गृहनिर्माण टाऊनशीपच्या अध्यक्षपदी नियुक्ती दिली. तक्रारदारांनी मागणी करुनही घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आयोगाने अद्याप दिलेले नाही.

निवडणूक निरीक्षकांच्या कर्तव्यांबाबत कार्यप्रणाली आहे. निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत पाच टप्प्यावर निरीक्षकाने अहवाल द्यायचा असतो. घटना घडल्यानंतर चहल यांची निवृत्ती महिन्याने झाली तरी त्यांनी अहवालच दिला नाही. चहल यांची मुख्य निरीक्षकपदी नियुक्ती पदाने नसून नावाने झाली होती. त्यामुळे चहल यांना निवृत्तीनंतरही अहवाल देणे बंधनकारक आहे. या निवडणुकीत चहल यांच्यासोबत अभिजीत घोरपडे, अजय पवार आणि जगन्नाथ विरकर हे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे तीन अधिकारी निरीक्षक म्हणून होते. आयोगाने या निरीक्षकांना त्या घटनेचा अहवाल देण्यास आता सांगितले आहे.

तक्रारी गायब :

राहूल नार्वेकर यांच्या विरोधातील तक्रारी आता मागे घेतल्या जात आहेत. तक्रारदारांपैकी माजी खासदार हरीभाऊ राठोड एक होते. राठोडांची तक्रार जनता दल (धर्मनिरपक्ष) प्रदेशाध्यक्षांनी परस्पर मागे घेतली. उमेदवारांच्या तक्रारी मतदानापूर्वी निकाली काढणे आवश्यक असते. या प्रकरणी तसे झाले असते तर नार्वेकर यांचे तीन नातेवाईक जे २२५ व २२६ आणि २२७ प्रभागांमध्ये उमेदवार होते, तेथे तक्रारदार १५ उमेदवारांना निवडणुकीत संधी द्यावी लागली असती.

मुख्य निवडणूक निरीक्षक इक्बालसिंग चहल हे अहवाल न देता निवृत्त झाले. त्यांच्यासोबतच्या निरीक्षकांकडे अहवाल मागितला आहे. अहवालानंतर कारवाईचा निर्णय होईल.- दिनेश वाघमारे,  आयुक्त , राज्य निवडणूक आयोग