मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यांचे बंधू एडवोकेट मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता अश्विन नार्वेकर आणि बहीण डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत दणदणीत यश मिळवले आहे.

महानगरपालिकेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया राहुल नार्वेकर यांच्या सहभागामुळे तसेच काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याच्या आरोपामुळे चर्चेत आले होते. पण निवडणूक निकालात नार्वेकर यांनी तिन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे या भागातला त्यांचा धबधबा कायम असल्याचे दिसून आले आहे.

राहुल नार्वेकर यांच्या भगिनी डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकर यांना विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या डॉ. गौरवी शिवलकर यांना ६,१३१ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या रेहाना गफूर शेख यांना २१४० मते मिळाली. जनता दल सेक्युलरच्या सुषमा भगवान साळवी यांना ८६ तर अपक्ष उमेदवार डॉ. लोरा डिसूझा यांना ९४३ मते मिळाली. नोटाला ३२१ मते मिळाली.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 226 मधून एडवोकेट मकरंद सुरेश नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांना १८०५८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांना ७९९७ मते मिळाली. नोटाला १४०४ मते मिळाली.

२२५ प्रभागातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता अश्विन नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. हर्षिता नार्वेकर यांना ११,३०७ मते मिळाली. भारतीय जनता पार्टीकडून त्या निवडणूक लढवीत होत्या.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजिंक्य अशोक धात्रक यांनी जोरदार चुरस निर्माण केली होती. त्यांना ६४२३ मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुजाता दिग्विजय सानप यांना ५७०२ मते मिळाली. आम आदमी पार्टीच्या दीपक सीलन यांना ३९० मते मिळाली. बहुजन वंचित आघाडीचे विशाल राहुल जौंजाळ यांना ६०८ मते मिळाली आणि अन्य अपक्ष मतदारांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. नोटाला ४४२ मते मिळाली प्रभाग २२५ मध्ये २५,४४५ मते वैध ठरली.