राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी; बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पदावर संधी देण्याची भाजपमधील परंपरा कायम

बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली जाते ही भाजपमधील मूळ नेते व कार्यकर्त्यांची सार्वत्रिक ओरड असताना विधानसभा अध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी असा प्रवास करून आलेल्या राहुल नार्वेकर यांना भाजपने संधी दिली आहे.

राहुल नार्वेकर

मुंबई : बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली जाते ही भाजपमधील मूळ नेते व कार्यकर्त्यांची सार्वत्रिक ओरड असताना विधानसभा अध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी असा प्रवास करून आलेल्या राहुल नार्वेकर यांना भाजपने संधी दिली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नार्वेकर हे जावई असल्याने पुढील काही दिवस उभय सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे सासरे व जावयाची जोडी असेल.

विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत आहे. भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अपक्ष गटाचे १७०च्या आसपास संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे असल्याने भाजपचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित. भाजपने अध्यक्षपदासाठी कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी विधिमंडळ सचिवालयात अर्जही दाखल केला.

शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी झालेली निवड ही धक्कादायक मानली जात होती. तसेच भाजपने अनेक वरिष्ठ नेत्यांऐवजी प्रथमच विधानसभेवर निवडून आलेल्या व बाहेरच्या पक्षातून आलेल्या नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देऊन धक्कातंत्राची परंपरा कायम ठेवली. पेशाने वकील असलेले ४५ वर्षीय नार्वेकर हे सुरुवातीला शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जही दाखल केले होते. पण शिवसेनेने त्यांना कधी आमदारकी दिली नाही. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने राज पुरोहित या जुन्याजाणत्या नेत्याला उमेदवारी नाकारून नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. नार्वेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

सासरे-जावयाची जोडी उभय सभागृहांचे पीठासीन अधिकारी

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. निंबाळकर यांची सभापतीपदाची मुदत ७ तारखेला संपत आहे. यामुळे नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास पुढील काही दिवस विधान परिषद आणि विधानसभेच्या पीठासीन अधिकारीपदी सासरे व जावयाची जोडी असेल.

विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी-सोमवारी

शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याकरिता विधानसभेचे खास अधिवेशन रविवार व सोमवारी होणार आहे. आधी हे अधिवेशन शनिवार व रविवार असे होणार होते. पण भाजप नेत्यांनी हैदराबादमध्ये होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावायची असल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul narvekar candidature assembly speaker bjp chance outside parties ysh

Next Story
अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपालांची आता परवानगी कशी?; काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा सवाल
फोटो गॅलरी