मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनानिमित्त शोक प्रस्ताव मांडताना मराठीचे धिंडवडे काढल्यावरून चौफेर टीका होऊ लागताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अशुद्ध मराठीवरून विरोधकांनी अध्यक्षांना पुन्हा चिमटे काढले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गायिका आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्या निधनानिमित्त विधानसभेत शोकप्रस्ताव संमत करण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मांडताना केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ‘पंडित दीनदयाळ मंगेशकर यांच्या संगीताच्या वारसा घेऊन’, ‘रेसिकांच्या’, ‘आवलौकिक’ ‘वेदन’ अशा मराठी शब्दांच्या उच्चारावरून नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष नार्वेकर यांनी आपली चूक मान्य करीत दिलगिरी व्यक्त केली.
त्या दिवशी विविध मान्यवरांच्या निधनाचे १२ शोकप्रस्ताव होते आणि त्याचे वाचन मी सभागृहात केले. त्यावेळी लेखी प्रत आपल्या हाती देण्यात आली होती, ती अत्यंत बारीक फॉण्टमध्ये आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या. वाचन करीत असताना जसेच्या तसे वाचन झाले ही एक चूक त्या दिवशी आपल्याकडून झाल्याचे नार्वेकर यांनी मान्य केले. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असे वक्तव्य करू शकत नसल्याचे नार्वेकर म्हणाले.
विरोधकांचे चिमटे हा प्रकार टाळायला हवा होता : शेलार
विधानसभा अध्यक्षांनी जो शोकप्रस्ताव मांडला, त्यांचे मराठी ऐकल्यानंतर हा महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न असून अध्यक्षांना साधे मराठी बोलता येत नाही, अशी खंत शिवसेनेचे (ठाकरे) अनिल परब यांनी व्यक्त केली. अध्यक्षांनी मांडलेला प्रस्ताव पटलावरून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनीही विधानसभेत हा प्रकार व्हायला नको होता, अशीही खंत व्यक्त केली.
