मुंबई : मंत्री आणि अधिकारी चर्चेवेळी विधानसभेत उपस्थित राहत नसल्यामुळे बुधवारी विरोधी सदस्यांनी सभागृह बंद पाडले. हा विषय वारंवार उपस्थित होत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर चांगलेच संतापले व ३० मिनीटांमध्ये मुख्य सचिवांनी सभागृहात उपस्थित राहावे, असे आदेश दिले.अध्यक्षांच्या या निर्देशामुळे राज्य प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या प्रकरणी संसदीय कामकाज मंत्री आणि अध्यक्ष यांच्यात जोरदार जुगलबंदी झाली.

दुपारी विरोधी पक्षाच्या २९३ च्या प्रस्तावर चर्चा सुरु होती. बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड बोलत होते. त्यावेळी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी संबधित मंत्री आणि सचिव दर्जाचे एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी सभागृहाची प्रतिष्ठा सरकार ठेवणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला. सभागृहातील उपस्थित मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मुद्यावर विरोधकांना समर्थन दिले. सत्तापक्षाची सुद्धा ही भावना असल्याचे विखे पाटील म्हणाले. तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.

सभागृह सुरु होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानापन्न झाले. मंत्री आणि अधिकारी हे वेळोवेळी सूचना देवूनही सभागृहात उपस्थित राहात नाहीत. हा प्रकार थांबायला हवा, असे म्हणत संसदीय मंत्री यांना निरोप द्या आणि पुढच्या ३० मिनीटांमध्ये मुख्य सचिवांनी येथे उपस्थित राहावे, असे निर्देश दिले. कठोर आदेश दिल्यामुळे विरोधी बाकावरुन अध्यक्षांचे सर्वांनी बाके वाजवून आभार मानले.

पुढच्या पाच मिनीटांमध्ये ससंदीय कामकाज मंत्री चंद्राकांत पाटील सभागृहात आले तसेच मुख्य सचिव राजेश आगरवाल, ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, नगरविकासचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे गॅलरीमध्ये उपस्थित झाले.

संजय गायकवाड यांचे भाषण संपले. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलण्यास उभे राहिले. मी १९८५ पासून या सभागृहात आहे. पण असा प्रकार पाहिला नाही. गृह विभागाच्या चर्चा असताना गृह सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित राहात असत, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झाल्या प्रकरणी सारवासारव केली.

बेळगाव सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकही आहे. मंत्री व अधिकारी कामात व्यग्र होते. विरोधी पक्षांनी समजून घ्यायला हवे, असे मंत्री पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले, सभागृह चालू असताना सभागृहाच्या कामकाजापेक्षा काहीही महत्वाचे नाही. मंत्री आणि अधिकारी चर्चेवेळी जर नसतील तर यापुढे मी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करेन, असे बजावले.

अध्यक्षांच्या या निर्देशाला दोन्ही बाजुच्या आमदारांनी बाके वाजवून पाठिंबा दिला. बार्शीचे ठाकरे शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी आज आपल्याला अध्यक्षाच्या या निर्देशामुळे मधुकरराव चौधरी यांची आठवण झाल्याचे सांगितले.