मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही आणि अद्याप काम पूर्ण होऊन ते रिसॉर्ट सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल करत शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला हास्यस्पद ठरवले. पण कोणत्याही चौकशीला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ईडीने अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी जवळपास १३ ते १४ तास चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. तर अनिल परब यांच्यावरील कारवाईचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल परब यांच्यावरील ईडीची कारवाई ही दबावतंत्राचा आणि सूडबुद्धीचा प्रकार असल्याची टीका केली. तर वांद्रे येथे शिवसैनिकांनी निदर्शने करत अनिल परब यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

ईडीचे अधिकारी १३ तासांच्या चौकशीनंतर मंत्रालयासमोरील अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानावरून निघाले. त्यानंतर अनिल परब यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपासून ईडीची कारवाई होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या. ईडीच्या लोकांकडे गुन्हा काय याची विचारणा केली असता दापोली येथील साई रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी सोडले जात असल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्याप्रकरणात ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.