केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीचा कटू निर्णय घेतल्याने त्याविरोधात शनिवारी देशभर उद्रेक झाला. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलने केली. अनेक ठिकाणी ‘रेल्वे रोको’ आंदोलन केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत रेल्वेच्या मासिक पासच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ‘रालोआ’चा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनीही या दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
निर्णय मागे घेण्याची सेनेची मागणी
मुंबईतील भाजपचे खासदार रेल्वेदरवाढीचे समर्थन करत असताना शिवसेना खासदारांनी मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने केलेली रेल्वे दरवाढ मागे घ्यावी अथवा ती कमी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येईल, असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लवकरच सर्व खासदारांची एक बैठक आयोजित करून या संदर्भातील पुढील व्यूहरचना निश्चित केली जाईल, असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी जाहीर केले. खासदार राहुल शेवाळे यांनी तर रेल्वेच्या मुंबईतील मालमत्तांचा व्यावसायिक वापर करून तोटा भरून काढता येईल आणि दरवाढ टाळता येईल, असा उपाय सुचवला.
प्रवासी भाडेवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. भाडेवाढीऐवजी प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर अधिक लक्ष द्यायला हवे. भाडेवाढ अपरिहार्य असेल तर त्याप्रमाणात सेवेचा दर्जा वाढायला हवा तरच जनतेला काँग्रेसचे सरकार आणि रालोआ सरकार यांच्यातील फरक समजेल.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मध्य रेल्वे तिकीट दरवाढ (कंसात जुने दर)

रेल्वे तोटय़ात आहे. त्यामुळे दरवाढ अटळ असल्याची जाणीव आहे. मात्र मासिक पासचा दर इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढवणे हा अन्याय आहे. मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर स्वच्छ आणि पुरेशी शौचालये, नेटकी स्थानके या प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत.
मधू कोटियन, अध्यक्ष उपनगरीय प्रवासी महासंघ.

मासिक पास दरवाढीचे समीकरण
लोकलच्या मासिक पासचे दरही यामुळे चांगलेच वाढले आहेत. आतापर्यंत १५ एकेरी तिकीट दराची रक्कम मासिक पाससाठी आकारली जात होती. आता ३० एकेरी फेऱ्या गृहीत धरल्या जाणार आहेत. तर प्रथम श्रेणीच्या मासिक पासचा दर हा द्वितीय श्रेणीच्या चौपट राहील, असे या दरवाढीचे ढोबळ गणित आहे.
भाजप खासदारांचे समर्थन
रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असले तरी भाजपच्या खासदारांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. एरव्ही रेल्वे दरवाढीविरोधात आंदोलन पुकारणारे भाजप नेते किरीटी सोमय्या यांनी भाडेवाढ योग्य असल्याचे म्हटले आहे. ‘‘ही दरवाढ काँग्रेस सरकारमुळेच लादली गेली असून ती तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी १६ मे रोजी स्थगिती देऊन थांबविली होती. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे द्यायलाही रेल्वेकडे पैसे नाहीत, अशी अवस्था त्यावेळी आली होती. त्यामुळे दरवाढीखेरीज अन्य कोणताही पर्याय शिल्लक नव्हता, असे सोमय्या म्हणाले. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही दरवाढीचे समर्थन केले.मागच्या सरकारने भाडेवाढ केली नव्हती म्हणून आताच्या सरकारने ती करू नये, असा गैरसमज करू नये, असेही शेट्टी म्हणाले.