मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये बाटलीबंद ‘रेलनीर’ पाण्याचा पुरवठा केला जातो. अंबरनाथमधील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून मध्य, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ‘रेलनीर’चा पुरवठा करण्यात येतो. मात्र, मागणीत वाढ झाल्यानंतर ‘रेलनीर’चा पुरवठा करण्यात आयआरसीटीसी अपयशी ठरली आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेच्या स्थानकांतील स्टॉलवरून ‘रेलनीर’च्या बाटल्या गायब झाल्या असून रेल्वे प्रशासनाने आता स्थानकांवर नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन महिन्यांत ‘रेलनीर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, अंबरनाथ येथील कारखान्यात बाटलीबंद पाणी निर्मितीची उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तुटवडा जाणवला. रेल्वे स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या अंबरनाथ येथील कारखान्यात दररोज एक लाख ७५ हजार बाटलीबंद ‘रेलनीर’ची निर्मिती करण्यात येते. या बाटल्यांचा पुरवठा सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला आणि एलटीटी टर्मिनस, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते कांदिवली आणि वांद्रे टर्मिनस येथे करण्यात येतो. तर उर्वरित स्थानकांत नऊ खासगी कंपन्याच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी दिली असून याव्यतिरिक्त अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री केल्यास संबंधित स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

‘रेलनीर’चा अपुरा पुरवठा होत असल्याने विभागीय रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील बहुतांश स्थानके वगळता बाटलीबंद पाणी पुरवण्याची जबाबदारी विभागीय रेल्वेकडे आहे. ‘रेलनीर’ वगळता अन्य नऊ खासगी कंपन्यांना १० जूनपर्यंत बाटलीबंद पाणी विक्रीची परवानगी दिली आहे.

– राहुल हिमालियन, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, पश्चिम विभाग

सध्या ‘रेलनीर’चा पुरवठा मागणी पेक्षा कमी झाल्याने नऊ खासगी कंपनीच्या बाटलीबंद पाण्याची विक्री सुरू आहे.  लवकरच ‘रेलनीर’ विक्रीस उपलब्ध होईल.

– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सीएसएमटी ते कुर्ला आणि चर्चगेट ते कांदिवलीपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा होत आहे. उर्वरित स्थानकांवर खासगी कंपन्यांच बाटलीबंद पाण्याची विक्री करता येईल.

– पिनाकीन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railneer water bottle shortage in summer passengers thirsty ysh
Show comments