अपघात टाळायचे, तर मार्गिका वाढवा!

भावेश नकाते अपघात प्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर झपाटय़ाने पसरले

मात्र डब्यांची संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात पुरेशा गाडय़ा नाहीत.

एमयूटीपी-२मधील महत्त्वाचे प्रकल्प अद्यापि रखडलेलेच
लोकलच्या दरवाजातून आत शिरण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या भावेश नकाते याचा हात सुटून तो धावत्या लोकलमधून पडल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांद्वारे झपाटय़ाने पसरले; परंतु असे अपघात भविष्यात होणार नाहीत याची हमी घ्यायला खुद्द रेल्वे प्रशासनही तयार नाही. ठाण्यापल्याडची लोकवस्तीच आता इतकी वाढली आहे की त्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या वाढविणेच रेल्वेला सध्याच्या स्थितीत शक्य नाही. परिणामी असे अपघात टाळायचे तर पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण केल्याखेरीज पर्याय नाही, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण झाल्यास या मार्गावरील फेऱ्या वाढून पर्यायाने अशा घटना कमी होतील. परंतु यातली गोम अशी की, पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पाबरोबरच इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असलेला एमयूटीपी-२ रखडल्याने त्याची किंमत तब्बल ६०० ते ७०० कोटींनी वाढली आहे.
अर्थात प्रवाशांचे हे रोजचे जिवावर उदार होऊन प्रवास करणे टाळायचे असेल तर रेल्वेने हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करायला हवा, अशी भावना व्यक्त होते आहे.
भावेश नकाते अपघात प्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर झपाटय़ाने पसरले आणि अक्षरश: किडा-मुंग्यांप्रमाणे दर दिवशीचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या व्यथेला वाचा फुटली. मात्र ही व्यथा तातडीने दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसत आहे.
वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी डब्यांची संख्या वाढवणे किंवा गाडय़ांच्या फेऱ्या वाढवणे, हे दोन उपाय करणे आवश्यक आहे.
मात्र डब्यांची संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात पुरेशा गाडय़ा नाहीत. गाडय़ांची संख्या वाढल्यानंतरही हार्बर मार्गावरील नऊ डब्यांच्या गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे फेऱ्या वाढवण्याचा उपाय करणे आवश्यक आहे.
या उपायासाठी मध्य रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या मध्य रेल्वेवरील चार मार्गिकांवरून उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक होते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे उपनगरीय गाडय़ांची संख्या वाढवणे शक्य नाही. परिणामी पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण झाल्याशिवाय गर्दीला दिलासा मिळणे शक्य नाही.

आता तर खर्चही वाढला
पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पाचा समावेश असलेल्या एमयूटीपी-२ या प्रकल्पाची किंमत प्रचंड वाढली आहे. २००८-०९च्या रेल्वे अर्थसंकल्पात मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची एकूण किंमत ५३०० कोटी रुपये होती. मात्र त्यात आता किमान ६०० ते ७०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला यादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी प्रस्तावित ६५९ कोटींच्या रकमेत ३०० कोटींची वाढ झाली असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ही मार्गिका पूर्ण होण्यातील भूसंपादनासारख्या अडचणीही अद्याप सुटल्या नसल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येत आहे. या सर्वच गोष्टींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत आहे, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway accidents increase in mumbai

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
फोटो गॅलरी