मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवरून थेट मडगाव जाणाऱ्या एक्स्प्रेसला मंगळवारी रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाली. या रेल्वेगाडीला ‘एक्स्प्रेस’ नाव दिले तरी, तिचा वेग ‘पॅसेंजर’चा असणार आहे. यासह या रेल्वेगाडीला मोजकेच थांबे देण्यात आल्याने, कोकणवासीयांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मोठ्या संख्येने कोकणातील लोकवस्ती असूनही, त्यांच्यासाठी वांद्रे टर्मिनसवरून स्वतंत्र रेल्वेगाडी नव्हती. गेल्या अनेक कालावधीपासून कोकणवासीय याबाबत पाठपुरावा करत होते. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वांद्रे टर्मिनस ते मडगाव या रेल्वेगाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वेकडून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे मंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार गाडी क्रमांक १०११५ वांद्रे टर्मिनस ते मडगाव आणि गाडी क्रमांक १०११६ मडगाव ते वांद्रे टर्मिनस दरम्यान आठवड्यातील दोन दिवस धावेल.
हेही वाचा >>> उद्धट वर्तनाला मान्यता नको; महाविद्यालय कर्मचाऱ्याची बडतर्फी कायम ठेवताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटून वांद्रे येथे रात्री ११.४० वाजता पोहोचेल. तर, बुधवारी आणि शुक्रवारी येथून सकाळी ६.५० वाजता वांद्रे येथून सुटून मडगाव येथे रात्री १० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिवी, करमळी येथे थांबा असतील. तर, या रेल्वेगाडीला २० एलएचबी असतील, असे रेल्वे मंडळाच्या पत्रातून जाहीर केले आहे.
नव्या सुरू होणाऱ्या रेल्वेगाडीला माणगाव, खेड, सावर्डा, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड आणि वैभववाडी रोड येथे थांबे देणे कोकणवासियांच्या अधिक फायद्याचे ठरले असते. त्यामुळे मुंबईस्थित कोकणवासियांचा प्रवास सोयीस्कर झाला असता. या रेल्वेगाडीला एक्स्प्रेसचे नाव असले तरी, थांबे हे अतिजलद रेल्वेगाडीसारखे मोजकेच दिले आहेत. ज्या थांब्यावर अनेक रेल्वेगाड्या थांबतात. तिथेच नवीन रेल्वेगाडीला थांबा देणे प्रवाशांसाठी फायद्याचे नाही. त्यामुळे आता पुन्हा या रेल्वेगाडीला नवीन थांबे देण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. – प्रथमेश प्रभू, प्रवासी
वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या रेल्वेगाडीचा प्रवास तब्बल १५ तासांचा असणार आहे. या एक्स्प्रेसचा सरासरी वेग ताशी ३९-४० किमी असेल. हा वेग सामान्यत: पॅसेंजर ट्रेनचा असतो. त्यामुळे नाव एक्स्प्रेस असून वेग पॅसेंजरचा असणार आहे. तसेच या रेल्वेगाडीचा कमी थांबे दिल्याने, प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी फारशी महत्त्वाची ठरणार नाही. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण रेल्वे समिती