मुंबईच्या उपनगरीय उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा ज्या वर्गाकडून येतो, त्या मासिक आणि त्रमासिक पासधारकांवर थेट दुपटीने वाढ लादणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने ही भाववाढ नक्की कधीपासून होणार, हे स्पष्ट न केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रमाची अवस्था आहे. २५ जूनआधी पास काढल्यास वाढीव दराने पास मिळणार की, पूर्वीचाच दर आकारला जाईल, तीन महिन्यांचा पास काढल्यानंतर पुढील दरांतील तफावत वळती करून घेणार का, या प्रश्नांची उत्तरे रेल्वेच्या तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यांकडेही नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. त्यातच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या भूमिकांमध्ये तफावत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रमावस्था होती.
‘अच्छे दिन आनेवाले है’ असे सांगणाऱ्या मोदी सरकारने रेल्वेसाठी चांगले दिवस आणण्याच्या प्रयत्नात भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल अशी भाडेवाढ केली. मात्र ही भाडेवाढ २५ जूनपासून लागू होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या भाडेवाढीनंतर उपनगरीय मासिक किंवा त्रमासिक पासच्या दरात तब्बल दुपटीने वाढ होणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेच्या एकूण प्रवाशांपैकी ७०-७५ टक्के प्रवासी मासिक पास काढून प्रवास करतात. त्यामुळे या प्रवाशांना जास्त फटका बसणार, हे गृहित होते. परिणामी दरवाढीचा फटका बसू नये, म्हणून अनेकांनी शनिवार व रविवार या दोन दिवशी पास काढण्यासाठी रांगा लावल्या. शनिवारी एकटय़ा पश्चिम रेल्वेवर ४२ हजार प्रवाशांनी मासिक पास काढले.
तीन महिन्यांचे पास मिळणार का?
२५ जूनआधी तीन महिन्यांचे पास जुन्या दरातच दिले जाणार का, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. मात्र त्याचे उत्तर तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांकडेही नव्हते. पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व बुकिंग कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या असताना मध्य रेल्वेवर मात्र या सूचना रविवारी संध्याकाळशिवाय दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेक खिडक्यांवर प्रवासी आणि बुकिंग क्लार्क यांच्यात वादावादीही होत होती. अखेर रविवारी संध्याकाळी मध्य रेल्वेनेही २५ जूनपर्यंत जून्याच दराने मासिक आणि त्रमासिक पास दिले जातील, हे स्पष्ट केले.
तिकिटांमधील फरक वसूल करणार
रेल्वे दरवाढ होण्याआधी २५ जून आणि त्यापुढील प्रवासाची तिकिटे आरक्षित करणाऱ्या प्रवाशांकडून जून्या आणि नव्या दरांतील फरक प्रवासादरम्यान वसूल केला जाणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र २५ जूनपर्यंतच्या प्रवासासाठी जूनाच दर आकारला जाणार आहे. त्यानंतरच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करायची असल्यास ती नव्या दरानेच आरक्षित केली जातील.