मुंबई : लोकलमध्ये सापडलेल्या पिशवतीतील सात लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने वसईतून शोधून काढले. ही रोकड पांढऱ्या रंगाच्या पिशवित होती. पोलिसांनी याच पिशवीचा मागोवा घेत चर्चगेटपासून विरारच्या दिशेने प्रत्येक स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.

कांदिवलीमध्ये वास्तव्यास असलेले सुरेंद्रकुमार श्रीवास्तव (६७) यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवले होते. मुलीसाठी दागिने बनविण्यासाठी ते १५ मे रोजी चर्नी रोड येथील एका सराफाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या एका पिशवीत पैसे गुंडाळून ठेवले होते. दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांनी राम मंदिर रेल्वे स्थानकातून चर्चगेट जलद लोकल पकडली. मात्र लोकल चर्नी रोड स्थानकात थांबणार नाही, अशी घोषणा लोकल मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचताच झाली आणि श्रीवास्तव घाईघाईत लोकलमधून मुंबई सेंट्रल स्थानकात उतरले. या गडबडतीत रोख रक्कम असलेली पांढरी पिशवी ते गाडीतच विसरले. हवालदीत झालेल्या श्रीवास्तव यांनी लगेच दुसरी लोकल पकडून चर्चगेट स्थानक गाठले. ती लोकल अद्याप स्थानकाच उभी होती. त्यांनी त्या डब्यात जाऊन शोध घेतला. मात्र त्यांना त्यांची रोख रक्कम असलेली पिशवी सापडली नाही.हताश झालेल्या श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या लोकलमध्ये श्रीवास्तव आपली पिशवी विसरले होते ती ट्रेन चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक ३ वर थांबली होती. पोलिसांच्या पथकाने स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले असता एक तरुण ही पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उतरत असलेला दिसला. त्याने लगेच लगतच्या फलाटावर लागलेली विरार लोकल पक़डल्याचे कॅमेऱ्यात दिसले. पोलीस पथकाने त्या ट्रेनचा मागोवा घेत प्रत्येक फलाटावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासायला सुरवात केली. हा तरुण वसई रेल्वे स्थानकात उतरताना दिसला. वसई (पू.) परिसरातील एका शेअर रिक्षात तो बसत असताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दिसला.

शेकडो रिक्षांचा शोध…

हा तरुण वसईत राहात असावा अशी एक शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी वसई स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. तेव्हा हा तरुण वसई स्थानकातून चर्चगेटला जाणारी ट्रेन पकडताना दिसला. आता त्याला वसईतून शोधण्याचे मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण यांच्या पथकाने पुढील तपास सुरू केला. हा तरुण एका रिक्षात बसताना दिसला. पुढचा तपास कठीण होता. मात्र पोलिसांनी प्रत्येक रिक्षा थांब्यावर जाऊन तपास केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी एक रिक्षा महामार्गाजवळील तुंगारेश्वर येथे गेल्याचे आढळले. या भागात दाट चाळी आणि प्रचंड लोकसंख्या आहे. त्या रिक्षातून उतरून तरुण या परिसरात चालत गेला होता. पोलिसांनी हा परिसरत पिंजून काढला. सर्वांना त्या तरुणाने छायाचित्र दाखवले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. एका इसमाने या तरुणाला ओळखले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या पथकाने एका चाळीत जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. शिवकुमार मौर्या (२०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला लोकलमध्ये रोख रक्कम असलेली पिशवी सापडली होती. मात्र ती परत करण्याऐवजी त्याने ती घेऊन पळ काढला. त्याच्याकडून ६ लाख ५२ हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले. पोलीस हवालदार प्रवीण घार्गे, संतोष देशमुख, सुनिल कुंभार, वैभव शिंदे, वैभव जाध, विकास रासकर, सतीश फडके, गणेश महागावकर, मयूर पाटील, अमरसिंग वळवी, सुनील मागाडे, स्वप्नील नागरे, आकाश सोनावणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.