मुंबई : रेल्वे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी; तसेच विधवा पासधारकांना राजधानी, दुरांतो आणि शताब्दी यांसारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांमध्ये त्यांच्या पासवरील पात्रतेपेक्षा उच्च श्रेणीत प्रवास करता येणार आहे. यासाठी संबंधित प्रवाशांना मूळ पात्र श्रेणी आणि निवडलेल्या उच्च श्रेणीतील भाड्याचा फरक भरावा लागणार आहे. रेल्वे मंडळाने नुकताच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
रेल्वे मंडळाच्या प्रिव्हिलेज पास, पोस्ट रिटायरमेंट कॉम्प्लिमेंटरी पास आणि विधवा पास धारकांना ही सुविधा लागू असेल. रेल्वे सेवक (पास) नियमावली १९८६ मधील तरतुदींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रीमियम गाड्यांमध्ये अधिक आरामदायी श्रेणीत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी प्रीमियम गाड्यांमध्ये पासच्या पात्रतेपेक्षा उच्च श्रेणीत प्रवास करण्याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, पास नियमावलीमध्ये अशा प्रवासावर कोणतीही बंदी नसल्याचे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले. तसेच, प्रवासाच्या पात्रतेसंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले संबंधित आदेश आणि सूचना रद्द करण्यात आल्या आहेत.
हजारो विद्यमान आणि निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे मंडळाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (क्रिस) च्या पीआरएस आणि एचआरएमएस प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरक्षण करताना किंवा ई-पासच्या माध्यमातून तिकीट आरक्षित करताना पात्रतेपेक्षा उच्च श्रेणी निवडून भाड्यातील फरक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो विद्यमान आणि निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
