रेल्वेच्या १,३०० फेऱ्या रद्द ; दहा कोटींच्या नुकसानीची शक्यता

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाब राम रहिम याला २५ ऑगस्ट रोजी बलात्काराची शिक्षा सुनवण्यात आली. मात्र ही शिक्षा सुनवण्याआधी आणि त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत रेल्वे मंत्रालयाकडून पंजाब आणि हरयाणात धावणाऱ्या तसेच त्या मार्गाने जाणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केल्या. त्या तीन ते चार दिवसांत तब्बल १,३०० फेऱ्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाला मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीची मोजदाद अद्याप सुरुच असल्याची माहीती,रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्ताकडून देण्यात आली.

सीबीआईच्या विशेष न्यायालयाने हरियाणातील पंचकुलामधील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा रहिम याला २५ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली. ही शिक्षा सुनावण्यापूर्वी दोन दिवस आधी तसेच २५ आणि २६ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये,यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून पंजाब आणि हरयाणामार्गे जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्या. यामध्ये मुंबईतून जाणाऱ्या ट्रेनचाही समावेश होता. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांना विचारले असता, नुकसानाची माहीती घेण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी निरज शर्मा यांनी सांगितले की, त्यावेळी ट्रेनच्या १,३०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ८० टक्के ट्रेनच्या फेऱ्या या पंजाब, हरयाणा येथील पॅसेजर्स ट्रेन होत्या. तर उर्वरित २० टक्के ट्रेन या त्या मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या होत्या. याबाबत नुकसानीची माहीती घेण्याचे काम सुरु आहे. झालेले नुकसान नेमके कोण भरुन काढणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही स्थानिक प्रशासनाशी बोलणीही सुरु असल्याचे म्हणाले. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार नुकसान झाल्याचा आकडा हा जवळपास १० कोटींपेक्षाही अधिक असू शकतो.