मुंबई : मागील आर्थिक वर्षात राज्यातील रेल्वे प्रवाश्ांसाठी केवळ एकच नवीन गाडी सुरू करण्यात आली. तर राज्याबाहेर जाणार्‍या सहा नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने राज्याबाहेरील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यांतर्गत रेल्वेगाड्यांची नितांत गरज आहे.

ज्या गाड्या धावत होत्या. त्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राज्याबाहेर जाणार्‍या सहा नव्या गाड्यांमुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

राज्यांतर्गत रेल्वेगाड्या जास्त संख्येने सुरू झाल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊ शकते. परिणामी, वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटण्यास मदत होईल. राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सेवा वाढवणे आवश्यक असल्याचे मत रेल्वे वाहतूक तज्ज्ञ अक्षय महापदी यांनी व्यक्त केले.

राज्यांतर्गत एकच रेल्वेगाडी

  • पुणे – अजनी वंदे भारत एक्स्प्रेस

राज्याबाहेर जाणार्‍या गाड्या

  • एलटीटी – सहरसा अमृत भारत एक्स्प्रेस
  • पनवेल – अलीपुरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस
  • हडपसर – जोधपूर एक्स्प्रेस
  • हडपसर – रेवा एक्स्प्रेस
  • हडपसर – मुजफ्फरपूर एक्स्प्रेस
  • साईनगर शिर्डी – तिरुपती एक्स्प्रेस

मागील आर्थिक वर्षात ज्या रेल्वेगाड्या सुरू केल्यात, त्या रेल्वेगाड्यांना महाराष्ट्रातील बहुसंख्य महत्त्वाच्या प्रमुख स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे तेथील प्रवाशांना याचा लाभ होतो. तसेच अनेक रेल्वेगाड्या देवदर्शनाच्या ठिकाणी जोडल्याने भाविकांना त्या ठिकाणी पोहोचणे सुलभ झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, अधिक गाड्या सोडल्या जातात. – डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.