ठाणे ते दिवा पाचवी, सहावी मार्गिका ६ फेब्रुवारीपासून खुली

मुंबई : मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. ही मार्गिका ६ फेब्रुवारीपासून खुली होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली. या मार्गिकेच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असा ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. या मार्गिकेच्या विविध कामांसाठी डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत मोठमोठे मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार डिसेंबर २०२१ मध्ये १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. तर जानेवारी २०२२ मध्ये २४ तासांचा आणि ३६ तासांचाही मेगाब्लॉक घेण्यात आला. २३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक असेल, अशी माहिती प्रशासनाने दिली. मध्यरात्री १.२० ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यावेळी साधारण ३०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द असतील. या ब्लॉकनंतर सर्वात मोठा ब्लॉक ७२ तासांचा असणार आहे. हा ब्लॉक ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असा घेण्यात येईल. त्यावेळी लोकल फेऱ्या रद्द करतानाच मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.

’ आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंत पाचवी व सहावी मार्गिका झाली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम गेली दहा वर्षे रखडले होते. मार्च २०१९ अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला. त्यानंतर जून २०२१ ही अंतिम मुदत ठरवण्यात आली. परंतु करोनामुळे कमी मनुष्यबळ व अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला. त्यामुळे आता मार्च २०२२ च्या आधी ही मार्गिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

’ ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकल फेऱ्या वाढवण्यास मदत मिळेल. त्यामुळे सुरुवातीला जास्तीत जास्त ८० लोकल फेऱ्या वाढण्यास मदत मिळेल. या फेऱ्या वातानुकूलित चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असा ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच ६ फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल.  – रवी अग्रवाल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी