मुंबई : रक्षाबंधन, गोपाळकाला व गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने १५ दिवसांचा रात्रकालीन ब्लाॅकचे नियोजन केले आहे. २८ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस विशेष वाहतूक व पाॅवर ब्लाॅक घेण्यात येईल. यामुळे टिटवाळा-कसारा मार्गावरील रात्रीच्या उपनगरी रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार असून, अनेक उपनगरी रेल्वेगाड्या रद्द केल्या जातील. काही गाड्या ठाणे वा कल्याणपर्यंतच धावतील. त्यामुळे कल्याण ते कसारादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे.
टिटवाळा स्थानकातील १५ डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाडीसाठी फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० पर्यंत सुमारे ५ ते ६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येईल. या ब्लाॅकमुळे सीएसएमटीवरून टिटवाळा, आसनगाव व कसारा दिशेला जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्या पूर्णत: व अंशत: रद्द करण्यात येतील.
रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी महिलांना रात्री उपनगरी रेल्वेगाडीचा प्रवास करताना अडचणी येतील. तसेच ४ सप्टेंबर रोजी गोपाळकाला असल्याने दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांऐवजी रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागले. मुंबईतील गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्यांना, गणेशोत्सवासाठी लागणारी सजावटीची साम्रगी खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ब्लॉकचा फटका बसणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीहून २८ ऑगस्टच्या रात्री १०, १०.५० व ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा उपनगरी रेल्वेगाडी रद्द करण्यात येणार आहेत. २९ ऑगस्टला मध्यरात्री १२.०८ ची सीएसएमटी-कसारा उपनगरी रेल्वेगाडीही रद्द करण्यात येणार आहे. टिटवाळ्याहून रात्री ९ व १०.०६ ची सीएसएमटी लोकल, रात्री ११.१४ ची टिटवाळा-ठाणे व आसनगावहून रात्री ११.०८ ची ठाणे उपनगरी रेल्वेगाडीही रद्द करण्यात येणार आहे.
२९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान सीएसएमटीहून रात्री १०, १०.५०, ११.१६ व ११.४२च्या टिटवाळा गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय रात्री ८.४१ ची कुर्ला, ८.५६ ची आसनगाव व मध्यरात्री १२.०८ ची कसारा गाडी रद्द करण्यात येणार आहे. टिटवाळ्याहून पहाटे ६.१३, रात्री ९ व १०.०६ च्या सीएसएमटी गाडी, तसेच रात्री १०.२५ व ११.१४ च्या ठाणे गाडीही रद्द करण्यात येणार आहेत.
काही फेऱ्या ठाणे-कल्याणपर्यंत
सीएसएमटीहून सकाळी ६.३० ची व दादरहून दुपारी ३.३३ ची टिटवाळा वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडी ठाण्यापर्यंतच धावतील. सीएसएमटीहून सकाळी ११.२४ व दुपारी १.४२ च्या टिटवाळा गाडीही ठाण्यापर्यंत धावतील. तसेच सकाळी ९.२७ व सायंकाळी ७.४६ ची सीएसएमटी-टिटवाळा गाड्या कल्याणपर्यंत चालविण्यात येतील. दरम्यान, टिटवाळ्यापर्यंत जाणाऱ्या काही सेवा आसनगावपर्यंत वाढविण्यात येतील. टिटवाळ्याहून सुरू होणाऱ्या काही गाड्या आसनगावहून चालवल्या जातील.
रात्री ११.३० ते पहाटे ५.१० काम
पहिल्या टप्प्यात २८ ऑगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत कल्याण – वासिंददरम्यान हा ब्लॉक असेल. या कालावधीत दर दिवशी रात्री ११.३० ते पहाटे ५.१० या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत टिटवाळा – कसारादरम्यान लोकल सेवा बंद असेल.
१५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटाची लांबी वाढविण्याचे काम या काळात करण्यात येणार आहे. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी रात्री १०.४७ वाजता आणि टिटवाळ्यासाठी रात्री ११.१६ वाजता शेवटची लोकल सुटेल.
ब्लॉकनंतर कसाऱ्यासाठी पहाटे ४.१९ वाजता पहिली लोकल धावेल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहाटे ३.५१ वाजता, तर टिटवाळ्याहून पहाटे ३.५६ वाजता पहिली लोकल सुटेल.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार असून, काही गाड्या १० ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. उर्वरित ब्लॉकचा तपशील मध्य रेल्वेकडून पुढील टप्प्यात जाहीर केला जाणार आहे.
