मुंबई : दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते १० दरम्यान लोकलमधून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. वर्षांनुवर्षे रखडलेले प्रकल्प, लोकलचा खेळखंडोबा, लोकलऐवजी लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य देणे याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेकडून निषेध केला जाणार आहे. २२ ऑगस्ट रोजी प्रवासी काळी फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करणार आहे. दोन रेल्वे स्थानकादरम्यान लोकल बराच काळ खोळंबते, २० ते ४० मिनिटे लोकल सेवा विलंबाने धावणे, लोकल अचानकपणे रद्द करण्यात येते आणि लोकल थांबवून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य देण्यात येते. असे प्रकार दररोज घडत असल्याने प्रवासी मेटाकुटीस आला आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यास उशीर होतो. तसेच प्रवासात प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण - बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, हार्बर मार्गाचे विस्तारीकरण, सीएसएमटी - कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार - डहाणू चौपदरीकरण, कळवा - एरोली उन्नत मार्ग असे अनेक प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. रखडलेल्या प्रकल्पामुळे नवीन लोकल सेवा सुरू करणे आणि लोकलचा वक्तशीरपणा वाढवण्यावर बंधने येतात. रेल्वे प्रशासनाच्या धीम्या कारभारामुळे प्रवाशांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतो. प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता निषेध आंदोलन सुरू केले जाणार आहे, असे मुंबई रेल प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले. हेही वाचा.मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक रेल्वे प्रशासन फक्त लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्याना प्राधान्य देत असून, मुंबईकरांच्या लोकलबाबत काहीही देणे घेणे नाही. गेल्या काही महिन्यांपासून लोकलचा वक्तशीरपणा बिघडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमुळे लोकलला विलंब होतो, असे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. लोकलमध्ये गर्दी होऊन प्रवाशांचा मृत्यू होतो. मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून प्रवास करतील. - सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा - पारसिक प्रवासी संघटना