scorecardresearch

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ, उद्यापासून नवीन दर होणार लागू

मध्य रेल्वेनं मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.

(File Photo)

एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या आहेत. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेनं मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी भाडेवाढ केली आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. संबंधित वाढ उद्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या आहेत. यातील ५३ घटना ह्या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. संबंधित आरोपींविरोधात भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बरेच गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात आहेत. पकडलेल्या आरोपींकडून आतापर्यंत ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत येणाऱ्या मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway platform ticket prices increases in mumbai by central railway rmm

ताज्या बातम्या