प्रवाशांची सुरक्षा हे मुख्य ध्येय असल्याचे वारंवार सांगणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे शब्द खरे करण्याची जबाबदारी राज्य पोलिसांच्या लोहमार्ग पोलीस विभागाने घेतली आहे. सुरक्षित प्रवासासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी ‘प्रतिसाद’ हे नवे वेब पोर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे या वेब पोर्टलवरून तक्रारदाराला एखाद्या विशिष्ट घटनेचे किंवा गोष्टीचे छायाचित्रही थेट लोहमार्ग पोलिसांकडे पाठवता येणार आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे वेब पोर्टल उपयुक्त ठरणार आहे.

लोहमार्ग पोलिसांनी सुरू केलेले हे वेब पोर्टल कोणत्याही ब्राऊझरवरून वापरता येणार आहे. हे वेब पोर्टल ब्राऊझरद्वारे थेट लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपशी जोडले गेले आहे. पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संदेश पोहोचल्याने प्रवाशांना तातडीने मदत मिळेल, असे लोहमार्ग पोलिसांतर्फे सांगितले जात आहे. तक्रार नोंदवण्यासाठी प्रवाशांनी कोणत्याही ब्राऊझरमधून helpline@mumrlypolice.gov.in  या लिंकवर जायचे आहे. या लिंकवर एक अर्ज येणार असून तो अर्ज भरल्यावर ही तक्रार थेट रेल्वे पोलिसांच्या संकेतस्थळावरही नोंदवली जाईल. या अर्जावर ‘सर्वसामान्य तक्रार’ आणि ‘तातडीची मदत’, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तसेच मराठी, हिंदूी किंवी इंग्रजी या तीनही भाषांमधून प्रवाशांना तक्रार नोंदवता येणार आहे.