मुंबई : प्रवासातील अडचणी सोडविण्यासह मदतीसाठी प्रवासी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर फोन करतात. या हेल्पलाईनवर प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींच्या संख्येत गेल्या काही वर्षांत ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २०२२ मध्ये रोज प्रवाशांच्या सरासरी १०० तक्रारी येत होत्या, मात्र वर्ष २०२५ मध्ये हीच संख्या दिवसाला १७०० ते १८०० वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक सुमारे २५ हजार तक्रारी प्रवासादरम्यान बॅग हरवली-विसरल्याच्या आहेत.
उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष मुंबई येथे १५१२ हेल्पलाईन ऑक्टोबर २०१७ पासून कार्यरत आहे. १५१२ रेल्वे हेल्पलाईवर दर दिवशी सरासरी १७०० ते १८०० फोन येतात. त्यापैकी सर्वाधिक फोन बॅग किंवा इतर सामान विसरल्याबाबत असतात. याशिवाय महिला, ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती, आजारी प्रवासीही मदतीसाठी फोन करतात. दररोजच्या एकूण फोनपैकी कारवाई योग्य १०० ते १३० फोन असतात.
रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान एकूण ३६ हजार १६६ फोन आले होते. त्यापैकी केवळ ६० फोनशी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढून मिटवण्यात आल्या आहेत. हेल्पलाइनवर येणारे ९९ टक्के फोन तक्रारींचे आहेत. मात्र अवघ्या एक टक्क्याहून कमी फोन गुन्हा दाखल करण्यायोग्य आहेत.
मोबाइल चोरीपासून डब्यात अनधिकृतपणे पत्ते खेळण्यापर्यंतच्या तक्रारी हेल्पलाइनच्या माध्यमाने पोलिसांकडे नोंदवण्यात येतात. सर्व तक्रारींची नोंद घेतली जाते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून गुन्हा दाखल केला जातो. हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे सर्वप्रथम समुपदेशनाने आणि त्यानंतर घटनास्थळी पोलिस पाठवून अडचणी सोडवल्या जातात.
गेल्या तीन वर्षांतील तक्रारींचा आढावा
- वर्ष – प्राप्त तक्रारी (फोन) – गुन्हा दाखल
- २०२२ – २१,८२७ – १९६
- २०२३ – ३३,३३७ – १२६
- २०२४ – ३९,८३९ – ८०
- २०२५ – ३६,१६६ – ६०
- एकूण – १,३१,१६९ – ४५९
हेल्पलाइनवर सर्वाधिक केल्या जाणाऱ्या तक्रारी
बॅग हरवली, दिव्यांग डब्यात सामान्य प्रवाशांची घुसखोरी, प्रवाशांमधील भांडण, आरक्षित डब्यातून प्रवास
३२ प्रकारच्या तक्रारी
बॅग हरवणे, बॅग सापडणे, प्रवाशांमधील भांडण, नशेखोरांचा वावर, गस्ती सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती, मद्यपान करून प्रवास, दिव्यांग डब्यात घुसखोरी, फेरीवाले, भिकारी, जखमी, रेल्वे पोलिस / सरकारी कर्मचाऱ्यांची अयोग्य वर्तणूक, व्यक्ती हरवली, व्यक्ती सापडली, महिलेची छेडछाड, आजारी पडणे, स्टंट करणे, दगडफेक, चोरी, तृतीयपंथीयांचा त्रासदायक वावर, आरक्षित डब्यातून प्रवास, संशयास्पद व्यक्तीचा वावर, पाकीटचोरी, पत्ते खेळणे, भजन गाणे, सोनसाखळी ओढणे, मोबाइल चोरी, बॉम्बने उडवण्याची धमकी, माहिती न मिळणे, दरोडा आणि अन्य (वरील तक्रारी वगळता अन्य तक्रार) अशा ३२ प्रकारच्या तक्रारी हेल्पलाइनवर नोंदवण्यात येतात.
