मुंबई : धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे. याशिवाय रेल्वे परिसरात मद्यपान करणारे व मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे रुळाजवळील वस्त्यांमध्ये रंगाचे फुगे न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून त्या ठिकाणी बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयामार्फत रेल्वे स्थानकांवर होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग पोलिसांमार्फत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामार्फत रेल्वे स्थानकांवर विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महिला प्रवाशांची छेड काढणाऱ्या व त्रास देणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे रूळानजीक असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या धावत्या रेल्वे वर पाण्याचे फुगे न मारण्याबाबत जनजागृती संबंधित रेल्वे पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेल्वे रूळालगत वस्ती असणाऱ्या शीव, वडाळा, कुर्ला आणि पश्चिम- रेल्वेच्या वांद्रे, माहीम सारख्या रेल्वे स्थानकांवर योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच रेल्वेवर फुगे व पाणी फेकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पथकांना देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यादृष्टीनेही विशेष लक्ष ठेवण्याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

गोंधळ घालणाऱ्यांवरही कडक कारवाई

तसेच रेल्वे स्थानकामध्ये किंवा परिसरात मद्यपान करणारे किंवा मद्यपान करून प्रवास करणारे रेल्वे प्रवासी तसेच गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांवर प्रवेश दारावर व बाहेर पडण्यासाठी असलेले अधिकृत, अनधिकृत मार्गांवर प्रवाशांनी मद्यपान केले आहे अगर कसे याबाबत तपास करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवरही तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक स्थानकावर महिला रेल्वे पोलिसांनाही तैनात करण्यात येणार आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून रेल्वे प्रवासादरम्यान प्रवास करताना दरवाज्यात उभे राहून किंवा लटकून प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रवासादरम्यान काही मदत लागल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्रमांक १५१२ वर संपर्क साधावा.

Story img Loader