१६०० अतिरिक्त पदांच्या भरतीसाठी पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव; रेल्वे बोर्डाकडूनही मंजुरी घेणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांची संख्या कमी पडत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येते. लोहमार्ग पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाचे कर्मचारीही तैनात असतात. मात्र हा बंदोबस्त पुरेसा नसून आता लोहमार्ग पोलिसांच्या ताफ्यात आणखी १६०० पदांची भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव लोहमार्ग पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे. लोहमार्ग पोलिसांचा निम्मा पगार रेल्वे देत असल्याने या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळणेही आवश्यक आहे.

मुंबईतील उपनगरीय प्रवास सुरक्षित होण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यावर असते. त्यापैकी रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा केली जाते, तर लोहमार्ग पोलीस प्रवासी सुरक्षेकडे लक्ष देतात. रेल्वे अपघातांपैकी रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठीही आता संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवण्यात येत आहे. तसेच महिलांच्या डब्यात रात्रभर पहारा ठेवण्याची जबाबदारीही लोहमार्ग पोलिसांकडेच असते.

या सर्व गोष्टींसाठी सध्या लोहमार्ग पोलिसांकडे असणारे ३५०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ अपुरे पडते. लोहमार्ग पोलीस रेल्वे स्थानकांवरही तैनात असतात. कुठेही अपघात झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना धाव घेऊन पंचनामा व पुढील प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे या दलाची संख्या वाढवण्याची गरज लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी स्पष्ट केले. तसेच ही संख्या वाढल्यास प्रवाशांसाठी उत्तम सुरक्षा व्यवस्था गाडय़ांमध्येही तैनात करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे १५ दिवसांपूर्वी एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार सध्याच्या ३५०० या संख्येत आणखी १६०० पोलीस कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रो स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांप्रमाणेच सुरक्षा रक्षक मिळावेत, यासाठीही प्रयत्न झाले होते. हे प्रयत्न फोल गेल्यानंतर आता हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांचे अर्धे वेतन रेल्वेकडून देण्यात येते. त्यामुळे हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडेही पाठवण्यात आल्याचे कौशिक यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway police watch now more strong
First published on: 17-11-2016 at 02:19 IST