केंद्र सरकारने राज्य सरकारच्या हातात हात घालून मुंबईचा विकास करण्यासाठी ‘मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पा’ची (एमयूटीपी) आखणी केली. शहरातील वाहतूक विषयक अनेक कामे मार्गी लागावी, यासाठी या प्रकल्पाचे टप्पेही आखण्यात आले. त्यापैकी फक्त पहिला टप्पाच पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील अनेक योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. तिसऱ्या टप्प्याला निती आयोगाची मान्यता मिळाली असली, तरी या प्रकल्पातील योजनांचा आवाका लक्षात घेता हा टप्पा पूर्ण होण्यासही खूप कालावधी लागणार आहे..

गेल्या आठवडय़ात एमयूटीपी-३मधील प्रकल्पांना निती आयोगाची मान्यता मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि मुंबईकरांसाठी आणखी काही प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली. कळवा-ऐरोली उन्नत जोड रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण, विरार-वसई-पनवेल या मार्गाचे दुपदरीकरण अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असलेल्या या योजनेतून हार्बर मार्गावर कॅब बेस्ड् सिग्नल यंत्रणा वगळण्यात आली आहे. तरीही या प्रकल्पांना आता निती आयोगाची मान्यता मिळाल्याने प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीची ददात मिटणार आहे.

Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

मुंबईकरांसाठी ही खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असली, तरी या निमित्ताने या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांचे काय झाले, याकडे पाहणे गरजेचे आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या टप्प्यात पश्चिम व मध्य रेल्वेवरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करणे, मध्य रेल्वेवर मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तन करणे, कुर्ला-ठाणे आणि बोरिवली-विरार यांदरम्यान दोन नव्या मार्गिका टाकणे अशी महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली होती. त्याशिवाय बेस्ट उपक्रमात नव्या बसगाडय़ा घेण्यासाठीही निधी देण्यात आला होता. या सर्व कामांसाठी ४४५० कोटी रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला.

त्यानंतर या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन भाग करण्यात आले. या दोन्ही भागांमध्ये सीएसटी-कुर्ला व ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका, बोरिवली-मुंबई सेंट्रल यांदरम्यान सहावी मार्गिका या मोठय़ा प्रकल्पांबरोबरच मुंबईच्या उपनगरीय सेवेत ७२ नव्या गाडय़ा, हार्बर मार्गाचे डीसी-एसी परिवर्तन, हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगाव विस्तार अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी हार्बर मार्गाचे डीसी-एसी परिवर्तन, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या सेवा हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पण अद्याप इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची पूर्तता कधी होणार, याबाबत अजूनही रेल्वे अधिकारीही निश्चित सांगू शकत नाहीत.

यापैकी दिवा-ठाणे पाचवी-सहावी मार्गिका आणि गोरेगाव-अंधेरी हार्बर मार्गाचा विस्तार या दोन प्रकल्पांसाठी डिसेंबर २०१७ ही नवीन कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सीएसटी-कुर्ला यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी डिसेंबर २०१९ ही कालमर्यादा ठरवली आहे. या सगळ्या प्रकल्पांचा आढावा विविध टप्प्यांवर घेण्यासाठी या प्रकल्पांच्या ठिकाणी नियमित येणे-जाणे होते. तेथील कामाचा वेग आणि उरक पाहता ही मर्यादाही पाळणे कठीण आहे.

सर्वप्रथम अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाच्या विस्ताराबद्दल! गेल्या वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पाच्या मार्गावरून फेरफटका मारला असता अर्थवर्क म्हणजेच रेल्वेमार्ग टाकण्यासाठीची तयारी झाल्याचे दिसले होते. ओशिवरा रेल्वे स्थानकही बांधून तयार होते. पण या नव्या स्थानकाजवळ उड्डाणपूल तयार नसल्याने हे स्थानक सुरू होण्यास विलंब लागणार होता. त्याशिवाय जोगेश्वरी स्थानकाजवळ रेल्वेच्या हद्दीत असलेल्या दारूच्या गुत्त्यामुळे हा विस्तार खोळंबला होता.

आता, एका वर्षांनंतर जुलै २०१६मध्ये या मार्गावरून परत फेरी मारली असता, गेल्या वर्षभरात अंधेरी स्थानकातील हार्बर मार्गाचे प्लॅटफॉर्म तोडून नवे प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम रेल्वे व एमआरव्हीसी यांनी पूर्ण केले आहे. ओशिवरा स्थानकाजवळील उड्डाणपूल पूर्ण झाला, पण आता या स्थानकाबाहेर बेस्टचे स्थानक नसल्याच्या कारणावरून स्थानक प्रवाशांच्या सेवेत येणे खोळंबले आहे. आता येत्या नोव्हेंबर महिन्यात हे स्थानक सुरू होणार असल्याचे सांगितले जाते. जोगेश्वरी स्थानकातील दारूच्या अड्डय़ाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते कधी सुटेल, याबाबत अनिश्चितता आहे.

ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका बांधण्याचे काम मध्य रेल्वेसाठी खूप महत्त्वाचे आहे. कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमधील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हे काम झपाटय़ाने पूर्ण व्हायची गरज आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात वार्ताकनासाठी ठाण्यापासून दिव्यापर्यंत नव्याने टाकल्या जाणाऱ्या मार्गावरून चालण्याचा योग आला. त्या वेळी कळवा पूल, पारसिकच्या डोंगराजवळील छोटा बोगदा आदी गोष्टी बांधून तयार होत्या. मुंब्रा आणि कळवा स्थानकाजवळ रेतीबंदर येथे असलेला वाहनांसाठीचा पूल नव्याने बांधण्याची गरज होती. त्या नव्या पुलाखालून या दोन नव्या मार्गिका जाणार आहेत. यंदा पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात या भागात फेरफटका मारला असता कळवा-मुंब्रा या स्थानकांदरम्यान काही ठिकाणी जमीन सखल करण्याचे काम वगळता फारसे काम झालेले नाही. दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबवण्यासाठी स्थानकाची रचना बदलण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आल्याने हे काम मागे पडल्याचे बोलले जाते. तरीही या दोन मार्गिका डिसेंबर २०१७मध्ये बांधून पूर्ण होतील, या दाव्यावर एमआरव्हीसी ठाम आहे.

सीएसटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि बोरिवली-मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका हे दोन प्रकल्पही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यापैकी सीएसटी-कुर्ला यांदरम्यान परळ टर्मिनस प्रकल्पाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले आहे. पण पाचवा-सहावा मार्ग सीएसटीपर्यंत आणायचा कसा, या विवंचनेत मध्य रेल्वेचे अधिकारी आहेत. त्यासाठी हार्बर मार्गाचे प्लॅटफॉर्म सीएसटी येथे पी. डिमेलो मार्गाजवळ नेण्याचा उप-प्रकल्पही विचाराधीन आहे. पण अद्याप या पाचव्या-सहाव्या मार्गिकेबाबत काहीच भरीव घडलेले नाही.

बोरिवली-मुंबई सेंट्रल यांदरम्यानची सहावी मार्गिकादेखील मालाड येथील एका दफनभूमीमुळे अडली आहे. या दफनभूमीकडे जाण्यासाठीचा मार्ग रेल्वेच्या हद्दीत आहे. पण तो मार्ग रेल्वेने सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी घेतल्यास स्थानिकांची गैरसोय होणार असल्याचा मुद्दा आहे. त्यामुळे या मार्गाचे काम थांबले आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग हे अडगळीत पडलेले दोन प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याच्या खटपटीही चालवल्या आहेत. त्यासाठीचे करारमदार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक सध्या कार्याधीन असलेल्या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार असताना त्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करून हा कालावधी कमी करण्याऐवजी नव्या प्रकल्पांची घोषणा करणे आतातायीपणाचे आहे. पण नेमका याचाच विसर रेल्वे मंत्रालयाला पडल्याचे दिसते. मुंबईकरांना दिवास्वप्ने दाखवण्यासाठी अशा प्रकल्पांची घोषणा करणे ठीक, पण त्या घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी असा आठ-दहा वर्षांचा अवधी लागणार असेल, तर मुंबईकरांच्या डोळ्यात केलेली ती एक धूळफेक ठरू शकते!

रोहन टिल्लू – tohan.tillu@expressindia.com

@rohantillu