‘एमयूटीपी’तील रेल्वे प्रकल्पांना निधीचे बळ

एमयूटीपी-३ ए मधील विविध प्रकल्पांसाठी  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (एआयआयबी) ३,५०० कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे.

३,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत; स्थानक विकास, सीबीटीसी यंत्रणेसाठी निधी

मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेल्या १९ स्थानकांचा विकास आणि मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील अत्याधुनिक सिग्नलसाठी सीबीटीसी यंत्रणा एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) राबविली जाणार आहे. यासाठी ३,५०० कोटी रुपयांचे आर्थिक बळ मिळणार असून लवकरच त्याला रेल्वे मंत्रालयांची अंतिम मंजुरी मिळेल, असा विश्वास एमआरव्हीसीकडून व्यक्त करण्यात आला.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेने स्थानकातील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे एमआरव्हीसीकडून एमयूटीपी ३ ए (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प) अंर्तगत १९ स्थानकांचा मोठय़ा प्रमाणात विकास करून अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय सीबीटीसी ही अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार दरम्यान ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे.  १९ स्थानक विकासासाठी ९४७ कोटी रुपये आणि सीबीटीसी यंत्रणेसाठी ६,२२८ कोटी रुपये खर्च येणार आहे. एमयूटीपी-३ ए मधील विविध प्रकल्पांसाठी  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (एआयआयबी) ३,५०० कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या असून फक्तनिधी मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी बाकी आहे. ती लवकरच मिळेल अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी दिली.

विकास करण्यात येणारी १९ स्थानके

मध्य रेल्वे मुख्य मार्ग : भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा

हार्बर मार्ग : जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द

पश्चिम रेल्वे : मुंबई सेन्ट्रल (लोकल), खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway projects in mutp get rs 3500 crore

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या