scorecardresearch

कल्याण-मुरबाड रेल्वे आंबिवलीमार्गे प्रस्तावित; उल्हासनगरमार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गात बदल

या पत्रानुसार नवीन रेल्वे मार्गिका ही कल्याण आंबिवली-टिटवाळामार्गे मुरबाड येथे जाणार आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वे आंबिवलीमार्गे प्रस्तावित; उल्हासनगरमार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गात बदल

मुंबई : कल्याण-मुरबाड या २८ किमीची नवीन रेल्वे मार्गिका उल्हासनगरमार्गे बांधण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्यानुसार नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड (उल्हासनगरमार्गे) नवीन रेल्वे मार्गिकेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसांत या रेल्वेच्या मार्गिकेत बदल करून कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गिका आंबिवली, टिटवाळामार्गे बांधण्यात येणार आहे.

या २८ किमीच्या नवीन मार्गिकेला मंजुरी मिळाली असून ८३६.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  यंदाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या ‘ब्लू बुक’मध्ये उल्हासनगरमार्गे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग नेण्याची नोंद आहे. मात्र, ३ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या कल्याण (आंबिवली)-मुरबाड मार्गाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील पत्र रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पाठवले आहे.

या पत्रानुसार नवीन रेल्वे मार्गिका ही कल्याण आंबिवली-टिटवाळामार्गे मुरबाड येथे जाणार आहे. ही मार्गिका २८ किमी असून ८३६.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.  टिटवाळा मार्गे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गिका २३.१२ किमी होण्याचा प्रस्ताव २०१६-१७ मध्ये होता. हा  मार्ग कल्याण, शहाड, आंबिवलीनंतर टिटवाळा, घोटसई, पोटगाव, किशोर आणि मुरबाड ही रेल्वे स्थानके येत होती. त्यानुसार, सर्वेक्षणाचा नकाशाही तयार करण्यात आला होता. मात्र, या मार्गात बदल करून मार्च २०१९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उल्हासनगरमार्गे जाणाऱ्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले.

उल्हासनगर येथून ही रेल्वे मार्गिका जाण्याचा प्रस्ताव असल्याने कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कांबा रोड, आपटी, पाटगाव आणि मुरबाड या चार स्थानके बांधण्यात येणार होती. २८ किमी रेल्वे मार्गासाठी ७२६.४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तर, हा मार्ग मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावात पुन्हा बदल करून कल्याण (आंबिवली)-मुरबाड मार्गिका आखल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याण-मुरबाड मार्ग उल्हासनगरमार्गे न जाता, हा मार्ग आंबिवली, टिटवाळामार्गे नियोजित करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 02:22 IST
ताज्या बातम्या