मुंबईतील पावसाळा आणि लोकल ट्रेन यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य मुंबईकरांना खूपच महागात पडते. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या दोन तीन वर्षांपासून या पावसाला तोंड देण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. यंदाही या दोन्ही रेल्वेमार्गावर मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या अखेपर्यंतच पूर्ण करण्यात येणार असून नालेसफाई, ट्रॅकची देखभाल, झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता उंचसखल भागामुळे रेल्वेमार्गावर पाणी तुंबते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी किंवा पाणी उपसण्यासाठी पश्चिम रेल्वेवर डिझेलचे ८० पंप आणि मध्य रेल्वेवर रेल्वेचे २३ आणि महापालिकेचे १६ असे ३९ पंप बसवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व ४३ नाल्यांची सफाई करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. लोकल गाडय़ांच्या डब्यांचीही डागडुजी सुरू आहे. मध्य रेल्वेने पावसाळ्यात होणारे सिग्नल यंत्रणेतील बिघाड टाळण्यासाठी हार्बर तसेच मुख्य मार्गावर यंदा ९५०हून अधिक डिजिटल अ‍ॅक्सेल काउंटर बसवले आहेत.