रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी डीसी-एसी परिवर्तनाला परवानगी देताना घातलेली वेगमर्यादा पाळणे मध्य रेल्वेच्या आवाक्याबाहेरचे असल्याने डीसी-एसी परिवर्तन तडीस नेण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला साकडे घातले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या दरम्यानच्या नऊ ठिकाणी घातलेल्या ताशी १५ कि.मी.च्या वेगमर्यादेमुळे दर दिवशी ४० ते ५० सेवा रद्द होण्याची शक्यता होती. यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आता रेल्वे बोर्डाकडून ५० कि.मी. प्रतितासाने गाडय़ा चालविण्याची परवानगी मिळवली आहे. मात्र या सर्व प्रकारात रेल्वे सुरक्षा आयुक्तांना डावलण्यात आले आहे. आता सोमवारपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गाडय़ा एसी विद्युतप्रवाहावर धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर ठाणे-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यानच्या डीसी-एसी परिवर्तनाचा मुहूर्त आतापर्यंत अनेक वेळा हुकला आहे. मात्र रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ातच हा मुहूर्त साधण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद प्रयत्नशील होते. दरम्यान, रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी या मार्गाचे परीक्षण करण्याची मागणी केली होती. या परीक्षणानंतर बक्षी यांनी कुर्ला ते सीएसटी या स्थानकांदरम्यानच्या नऊ संवेदनशील जागांसाठी १५ कि.मी. प्रतितासाची वेगमर्यादा आखून दिली. एसी विद्युतप्रवाह हा २५,००० व्होल्टचा असल्याने ओव्हरेहड वायरपासून काही अंतर मोकळे असणे आवश्यक असते. मात्र या नऊ ठिकाणी अंतर खूप कमी असल्याने ते धोकादायक ठरू शकते, असे निरीक्षण रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नोंदवले.
मात्र, ताशी १५ कि.मी. वेगाने नऊ ठिकाणी गाडय़ा चालल्यास मध्य रेल्वेमार्गावरील किमान ४० ते ५० सेवा दररोज रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठीही वेगमर्यादा उठवणे अथवा शिथील करणे गरजेचे होते.
अखेर मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे विनंतीपत्र पाठवून ताशी १५ ऐवजी ५० कि.मी.चा वेग वाढविण्याची विनंती केल्याचे आणि रेल्वे बोर्डानेही ही परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांना विचारले असता हँकॉक पूल वगळता इतर ठिकाणच्या वेगमर्यादा शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हँकॉक पुलाजवळ मात्र १५ कि.मी. प्रतितास याच वेगाने गाडय़ा धावतील, असे ते म्हणाले.
याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांना विचारले असता आपल्याला काहीच माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. धोकादायक ठिकाणी ताशी १५ कि.मी. वेग राखण्याची शिफारस आपण मध्य रेल्वेला केली आहे. मात्र त्यानंतर त्यांनी वेग वाढवून घेतला असल्यास आपल्याला त्याबाबत काहीही कल्पना देण्यात आली नाही, असे बक्षी यांनी सांगितले.

धोकादायक ठिकाणी ताशी १५ कि.मी. वेग राखण्याची शिफारस आपण मध्य रेल्वेला केली आहे. मात्र त्यानंतर त्यांनी वेग वाढवून घेतला असल्यास आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नाही तसेच याबद्दल आपल्याला कल्पनाही देण्यात आली नाही.
रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी