मुंबई : रेल्वे विभागाच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग अंशत: रद्द केले आहेत. राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रवाशांमध्ये नाराजीच सूरू उमटत आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक आखताना कमी प्रवासी असलेल्या आणि समांतर मार्गांवरील गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या शून्य आधारित वेळापत्रकात राज्यांतर्गत रेल्वेगाड्या सर्वाधिक बंद करण्यात आल्या. करोनाकाळानंतर या रेल्वेगाड्यांची सेवा खंडित करण्यात आली.
नुकतीच दादर-गोरखपूर कायमस्वरूपी रेल्वेगाडी चालवण्यात येत आहे. २०२० पूर्वी दादर- रत्नागिरी पॅसेंजर हजारो प्रवाशांना सेवा देत होती. ही रेल्वेगाडी कमी गर्दीच्या वेळी दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी धावत होती. परंतु लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दादरऐवजी दिवा-रत्नागिरी अशी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. परंतु, २०२० पूर्वी लोकल वक्तशीरपणाचे कारण रेल्वेने दिले नव्हते. तसेच त्या वेळी ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका नव्हती. आता पाचवी आणि सहावी मार्गिका आहे. दिवा ते विद्याविहार दरम्यान कोकण रेल्वेच्या दिशेने जाणार्या रेल्वेगाड्यांसाठी एक समर्पित रेल्वे मार्गिका उपलब्ध आहे. असे असतानाही रेल्वेगाडी बंद करून उत्तर भारतातील रेल्वेगाडी चालवण्यात येते. वक्तशीरपणाचा मुद्दा वापरून रेल्वेगाड्यांच्या मूळ स्थानकात बदल केला जात असेल, तर कोकण रेल्वेच्या सर्व रेल्वेगाड्यांना लागू होतो. म्हणजेच मध्य रेल्वेचा सर्व रेल्वेगाड्या दिवा किंवा पनवेल येथे वळवण्याचा विचार आहे का, असा प्रश्न कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी उपस्थित केला.
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ यांना जोडणार्या राज्यांतर्गत रेल्वेगाड्यांची आवश्यकता प्रवाशांना आहे. सर्वसामान्य प्रवाशांना या रेल्वेगाड्यांचा आधार असून, शैक्षणिक, व्यावसायिक, धार्मिक दृष्टिकोनातून राज्यांतर्गत रेल्वेगाड्यांना महत्त्व आहे. परंतु रेल्वेगाड्या थेट बंद करून प्रवाशांना वार्यावर सोडले जात आहे. याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला.
रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव
रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणार्या विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे. नुकताच होळी आणि उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र, यातही दुजाभाव करण्यात आल्याचे दिसून येते. राज्यातंर्गत रेल्वेगाड्या साप्ताहिक चालवण्यात येतील, तर उत्तर भारतात जाणार्या रेल्वेगाड्या दररोज, आठवड्यातून तीन ते चार वेळा चालवण्यात येण्याचे नियोजन केले आहे. सीएसएमटी ते मडगाव, एलटीटी ते मडगाव या रेल्वेगाड्या साप्ताहिक चालवण्यात येतील. तर सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दाणापूर या रेल्वेगाड्या दररोज चालवण्यात येतील. तसेच दादर ते गोरखपूर आठवड्यातून चार वेळा, दादर ते बलिया आठवड्यातून तीन वेळा चालवण्यात येतील.
या गाड्या बंद…
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर आणि पनवेल मार्गे धावणारी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू.
या गाड्या सुरू…
दादर ते गोरखपूर, दादर ते बलिया, एलटीटी ते सहरसा अमृत भारत, पनवेल ते अलिपूरद्वार अमृत भारत.
