रेल्वे भाजपाची नोकर आहे का?; रावसाहेब दानवेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

भाजपा अगदी रस्त्यांवर, रुळांवर आडवे पडले. असे आडवे पडले की इथून आम्ही उठणारचं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Railways a servant of BJP Sanjay Raut reply to Raosaheb Danve

करोना संकटात सर्वसामान्यांसाठी बंद असणारी लोकल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचं जाहीर केलं आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं असून यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

“रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. ती कुठल्या राजकीय पक्षाची नसते. पण काही लोकांना वाटतं की रेल्वे आमची खाजगी संपत्ती आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरील काही गोष्टी ज्याच्यावर राष्ट्रीय स्तरावर निर्णय घ्यायला पाहिजे त्या आमच्या व्यक्तीगत आहेत आमच्या पक्षाच्या आहेत असं वाटतं. मुंबईमध्ये लोकल सुरु करावी यासाठी सर्वात मोठं आंदोलन भाजपाने केलं. मुंबईमध्ये करोना संक्रमण वाढू नये म्हणून लोकल बंद होती. आता ही संख्या घटतीय तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेणार होते. पण भाजपा अगदी रस्त्यांवर, रुळांवर आडवे पडले. असे आडवे पडले की इथून आम्ही उठणारचं नाही”, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपाच्या रेल्वे आंदोलनावर टीका केली आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- Mumbai Local: आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी- रावसाहेब दानवे

“हे आमचे रावसाहेब दानवे त्यांनी सांगितलं की केव्हाही रेल्वे सुरु करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे आमच्या महाराष्ट्राच्या रेल्वे राज्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. आता शिर्षासन कशाला करताय. हा सर्व जो काही प्रकार चाललेला आहे याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात. काल म्हणाले सुरु करा आणि आज इथे त्यांचे लोक आले आणि रावसाहेबांची भाषा बदलली. रेल्वे काय भाजपाची नोकर आहे का? नाही. आपण महाराष्ट्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे. तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघु हा काय प्रकार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

रेल्वे प्रवासाठी दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट आहे. उपाहारगृहे, धार्मिकस्थळे आणि मॉल्सबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे संकेत समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील लाखो नोकरदारांना दिलासा दिला आहे. रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत जनमताचा रेटा वाढला होता. रेल्वे सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांना रेल्वेसेवेची मुभा मिळणार आहे. मुंबईतील १९ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती रविवारी मुख्यमंत्र्यांनी दिली.

रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर किं वा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अ‍ॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शकेल. गेल्या एप्रिलपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली रेल्वेसेवा जवळपास चार महिन्यांनी पुन्हा सुरू होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Railways a servant of bjp sanjay raut reply to raosaheb danve abn

ताज्या बातम्या