मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेवरील स्वस्तात शुद्ध पाणी सेवा उपलब्ध करणाऱ्या पाणी विक्री यंत्राला (वॉटर वेंडिंग यंत्र) अद्यापही टाळेच लागलेले आहे. दोन्ही मार्गावरील सर्वच स्थानकात ही यंत्रे धूळखात असून प्रवाशांना स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉलमधून बाटलीबंद पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील ३४ आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय ३० स्थानकात ही सुविधा तीन महिन्यात उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली.
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्वस्तात शुद्ध आणि गार पाणी मिळावे यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने आयआरसीटीसीमार्फत सर्व स्थानकात पाणी विक्री यंत्र बसवली. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंतच्या ३० स्थानकात आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल आणि लोणावळा, खंडाळा विभागातील स्थानकात पाणी विक्री यंत्रे बसवली. ३०० मिलि लिटर पाणी प्रवाशांच्या बाटलीमध्ये हवे असल्यास त्यासाठी एक रुपया आणि रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये हवे असल्यास दोन रुपये मोजावे लागत होते. ५०० मिली लिटरसाठीही अनुक्रमे ३ आणि ५ रुपये, एक लिटर पाण्यासाठी अनुक्रमे ५ आणि ८ रुपये, दोन लिटर पाण्यासाठी ८ आणि १२ रुपये दर निश्चित केले होते.
करोनाकाळात बंद करण्यात आलेली ही यंत्रे आजतागायत सुरूच केलेली नाहीत. याचे कंत्राटही संपुष्टात आले असून ही यंत्रे धूळखात पडली आहेत. आता त्यांना टाळे लागले आहे. काही यंत्रे गंजली आहेत. वाढलेल्या उकाडय़ात तहान भागवण्यासाठी प्रवाशांना खाद्यपदार्थ स्टॉलवरील मिळणारे बाटलीबंद पाणी घ्यावे लागत आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेने ही सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने ३४ आणि पश्चिम रेल्वेने ३० स्थानकात सुविधा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.
उपनगरीय स्थानकात पुढील तीन महिन्यात पाणी विक्री यंत्रे बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.
मध्य रेल्वेवर येथे नवी यंत्रे
ठाणे, लोणावळा, माथेरान, पेणे, नागोठणे, जिते, आप्टा, खंडाळा, शीव, मुंब्रा, मानखुर्द, भांडुप, मुलुंड, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, कॉटन ग्रीन, शिवडी, वडाळा रोड, परेल, नेरळ, कसारा, खडवली, खर्डी, वाशिंद, आटगाव, कमान रोड, खारबाव, रे रोड, तळोजा, कळंबोली, निळजे, शेलू, भिवपुरी रोड