मुंबई : मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात तीन-चार दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी मुंबईत दुपारनंतर विश्रांती घेतली. दिवसभरात २० मिमीपेक्षाही कमी पाऊस पडला. शहर भागात सरासरी १० मिमी तर पूर्व उपनगरांत सरासरी १८ मिमी तर पश्चिम उपनगरात सरासरी २८ मिमी पाऊस पडला. 

दाटून आलेले मळभ, वारा यांमुळे बुधवारप्रमाणेच गुरुवारीही मुसळधार पावसाचे वातावरण पहाटेपासून तयार झाले. मात्र, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहर आणि उपनगरांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या सरींनी सायंकाळपर्यंत हजेरी लावली. दक्षतेच्या इशाऱ्यासह मुसळधार पावसाच्या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याला पावसाने हुलकावणी दिली. हवामान विभागाने शुक्रवारी मुंबई आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

पश्चिम उपनगरात एका ठिकाणी घर पडण्याची तक्रार आपत्कालीन विभागाकडे आली. तर १८ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या. तर शहर व उपनगरात मिळून ४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दुपापर्यंत पावसाने हजेरी लावलेली असली तरी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती. लोकल रेल्वेचे बुधवारी कोलमडलेले वेळापत्रक मात्र गुरुवारीही पूर्वपदावर आले नव्हते.  दरम्यान, खेड-चिपळून दरम्यान रूळांवर मातीचा ढिगारा कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली़

पुन्हा ऑनलाइन वर्ग

करोना साथीच्या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्ययन न होता ऑनलाइन वर्ग भरत होते. त्यानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर बहुतेक शाळांनी ऑनलाइन वर्ग बंद केले. करोनासाथीच्या काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा मुंबईतील बहुतेक खासगी शाळांच्या गुरुवारी कामी आली. राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पावसामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईत शाळा बंद ठेवण्याबाबत पालिका आयुक्तांनी कोणतेही आदेश काढले नव्हते. मात्र अनेक खासगी शाळांनी सकाळच्या सत्रातील वर्ग ऑनलाइन घेतले. मुंबईत शाळा भरणार की सुट्टी याबाबतचा गोंधळ बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काही शाळांनी बुधवारी मध्यरात्री तर काही शाळांनी गुरुवारी पहाटे पालकांना संदेश पाठवून वर्ग ऑनलाइन भरणार असल्याचे सांगितले. पालिकेच्या सर्व शाळा मात्र भरल्या होत्या.

तानसा तलाव काठोकाठ

मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा तलाव गुरुवारी रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुधवारी मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी २ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाटय़ाने वाढली आहे.