वाहन दुरुस्तीसाठी धावाधाव

मुसळधार पावसामुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड; गॅरेजमध्ये वाहनांच्या रांगा

मुसळधार पावसामुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड; गॅरेजमध्ये वाहनांच्या रांगा

मुंबई : गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसात हजारो वाहने पाण्याखाली गेली होती. बिघाड झालेल्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी वाहन मालकांच्या रांगा लागल्या असून सध्या गॅरेजही मर्यादित वेळेत सुरू असल्याने दुरुस्तीसाठी अधिकच वेळ लागत आहे.

मुंबईत दोन आठवडय़ांपूर्वी पाऊस कोसळला. या पावसात उपनगरातील बहुतांशी भागात पाणी साचले. रस्ते, इमारतींचे तळमजले, वाहनतळ, बैठय़ा चाळी अक्षरश: पाण्यात बुडाल्या होत्या. परिणामी वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सध्या मुंबईसह उपनगरांमधील वाहन दुरुस्तीच्या दुकानांबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बिघाड झालेल्या वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ वाहनधारकांवर आलेली आहे. त्याचप्रमाणे सध्या गॅरेज सुरू ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा आहे.

‘स्कूटरचे पावसामुळे अधिक नुकसान झाले आहे. शिवाय जे कामानिमित्त बाहेर वाहन दुरुस्तीसाठी रांगा

असल्याने पावसातून गाडी चालवत घरी गेले, त्या दुचाकी बंद पडल्या आहेत. गेले आठ दिवस आम्ही सातत्याने दुरुस्तीच करत आहोत. वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्येकाला वेळ देऊन बोलावले जाते. कामाचा ताण अधिक असल्याने दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. मुंबईत दरवर्षी असे प्रकार होत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, सुटे भाग घेऊन आम्ही दुरुस्तीच्या तयारीत असतो. काबरेरेटर, एअर फिल्टर, इंजिन ऑइल, लायनर, ब्रेक वायर बाद होण्याचे प्रमाण अशा गाडय़ांमध्ये अधिक असते,’ असे अमृत गॅरेजच्या अझीम खान यांनी सांगितले.

चारचाकी वाहनांसाठी यांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. गाडीच्या इंजिन आणि अन्य भागांसोबत गाडीतील कार्पेट, आसनेदेखील भिजली आहेत. त्यामुळे या वाहनांच्या दुरुस्तीला वेळ लागत आहेत. यामध्ये काही वाहने त्याच कंपनीकडे तर काही वाहने खासगी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी जात आहेत. ‘वाहनाचे नुकसान किती झाले आहे त्यावर त्याच्या दुरुस्तीला लागणारा वेळ ठरतो. सध्या अधिकचे मनुष्यबळ वापरून चार ते पाच दिवसांत वाहने दुरुस्त करून दिली जात आहेत. याच वेळेस नियमित सव्‍‌र्हिसिंग करणारी वाहनेही येत असल्याने वेळ लागतो आहे. या पावसाळ्यात बऱ्याच गाडय़ांच्या बैठकीपर्यंत पाणी शिरल्याने वाढीव खर्चही वाहनधारकांना करावा लागत आहे,’ अशी माहिती मेकॅ निक दीपक कोळी यांनी दिली.

अधिकृत कंपन्यांमध्ये वाहन दुरुस्तीची संख्या अधिक

अधिकृत कंपन्यामध्ये मात्र वाहन दुरुस्तीची संख्या तुलनेने जास्त आहे. येथे वीस-पंचवीस दिवस दुरुस्तीसाठी थांबावे लागत आहेत. ‘पावसाळ्यात कामाचा ताण अधिक असतो. सव्‍‌र्हिसिंगची वाहने नियमित येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी नियोजित वेळ दिला जातो. पावसात बिघडलेल्या वाहनासाठी कंपनीची विशिष्ट कार्यपद्धती आहे. ज्यामध्ये वाहनाची पाहणी केली जाते. नुकसानीचा अंदाज घेतला जातो, दुरुस्तीची रक्कम कळवली जाते, विमा पाहिला जातो आणि मग वाहन दुरुस्तीसाठी येते. सध्या पावसात बंद पडलेल्या वाहनांची संख्या अधिक असल्याने दुरुस्तीपर्यंत किमान २० ते २५ दिवस जातात,’ असे एका मोठय़ा कंपनीच्या अंधेरी येथील सव्‍‌र्हिस सेंटरमधील व्यवस्थापकांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rain hit vehicles long queues of vehicles in the garage for repair zws