कांदा, द्राक्ष, काजू पिके धोक्यात  पश्चिम उपनगरे, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत मुसळधार
पुणे, नगर, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत शनिवारी रात्री आणि रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, काजू पिकांना फटका बसणार आहे. दुष्काळामुळे वाढलेल्या महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. पावसाने राज्यभरात मोठे नुकसान अद्याप झाले नसले, तरी या पावसाने हाताशी येऊ घातलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोकण भागातील भात शेती, काजूच्या पिकाला येऊ लागलेला मोहोरही धोक्यात आला आहे. रविवारी मुंबईत पश्चिम उपनगरे, नवी मुंबई, ठाणे-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे काही भागात वीज गेली होती.
ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यांसोबत भारताच्या दक्षिण टोकावर मोठय़ा प्रमाणात आलेले बाष्प अरबी समुद्रात मध्यभागी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ओढले गेले आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये ढगाळ वातावरण आहे. याच क्षेत्राच्या प्रभावामुळे रविवारी मुंबईत पश्चिम उपनगरात तसेच ठाणे-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरण व बॅरेज येथे हा पाऊस जोरात झाल्याने या भागातील नागरिकांना भविष्यात पाण्याच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत रविवारी सकाळपासूनच पावसाळी आणि ढगाळ वातावरण होते. रात्री सव्वाआठ-साडेआठच्या सुमारास अंधेरी ते दहिसर परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात सुखद गारवा आला आहे. रात्री साडेआठ वाजताच्या नोंदीनुसार सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे ३३.०७ व ३३.०२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. ढगांच्या आच्छादनामुळे किमान तापमानातही वाढ झाली असली तरी गारपीट झाल्यास थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे १.५ व १.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात गारपीट झाल्यास किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

तुरळक सरी, गारपिटीची शक्यता
सोमवारीही मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ राहणार असून काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारी राज्याच्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.
प्रवाशांची गैरसोय
पावसाने ठाणे व उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात बदलापूर व अंबरनाथ दरम्यान रेल्वे इंजिन बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही दीड तास ठप्प झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना याचा दुहेरी फटका बसला.