मुंबई : मागील दोन दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह इतर भागातही अधूनमधून पाऊस पडत आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरला होता. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आहे. दरम्यान, गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि शेजारच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रणाली समुद्रसपाटीपासून सरासरी ५.८ किमी उंचीवर पसरलेली आहे आणि दक्षिणेकडे झुकली आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा उत्तर गुजरातपासून गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमधील परिसरावर समुद्रसपाटीपासून सरासरी ३.१ किमी उंचीवर आहे . याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून कमी दाबाचा पट्टा कायम आहे. वरील हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

याचाच परिणाम म्हणून शनिवारपासून मंगळवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार, तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर राहील. तर, कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी रविवार आणि सोमवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहील. या कालावधीत विदर्भात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. भंडारा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यातही शनिवारपासून सोमवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

पावसाचा अंदाज

मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर

अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया गडचिरोली, वर्धा, वाशिम , यवतमाळ