मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीची (SIR) घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी (MVA ) नेत्यांना या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पश्चिम बंगालमधील मतदार वगळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करा अन्यथा 2029 च्या विधानसभेला भाजपा जिंकेल, असा इशारा दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी, बूथ-स्तरीय एजंटांना (बीएलए) प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडणूक आयोगाशी समन्वय साधण्यासाठी कार्यदल स्थापन केले पाहिजे.

बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले गेले. आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि दुर्बल गटांमधील मतदारांना याचा फटका बसतो आहे. या प्रक्रियेमध्ये बिहारमध्ये ६८ लाख आणि पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख मतदार वगळले गेले. जर मविआने वेळेवर कार्यवाही केली नाही, तर महाराष्ट्रालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा आमदार शेख यांनी दिला आहे.

अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, एसआयआर प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारसंघांमध्ये २५,००० पर्यंत मतदार वगळण्यात आले होते, तेथे भाजपने ९५ जागा जिंकल्या आहेत. ज्यामुळे ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पराभवास हातभार लागला, असा दावाही आमदार शेख यांनी केला.

एसआयआर उपक्रमांतर्गत बूथ-स्तरीय अधिकारी (BLOs) ३० जून ते २९ जुलै दरम्यान मतदारांच्या घरी भेट देतील. कागदपत्रांची पूर्तता करणे, नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया आणि आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मतदारांना मदतीची आवश्यकता आहे. मविआ आघाडीतील सर्व पक्षांच्या बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLAs) यासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाशी समन्वय साधण्यासाठी कृती दलाची आवश्यकता आहे, असे आमदार शेख यांचे म्हणणे आहे.

मतचोरी रोखणे आवश्यक :

महाविकास आघाडीने यासंदर्भात तातडीने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, सत्ताधारी पक्षाकडून होणारी मतचोरी आम्ही थांबवू शकणार नाही. राज्यस्तरीय कृती दलामध्ये आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा, असे आमदार रईस शेख यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.