अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण अटक झाल्यानंतर रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्र यांनी तातडीने आपल्याकडी सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा >> राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

राज कुंद्रा प्रकरणामध्ये चौकशी करत असणाऱ्या पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिलीय. पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज कुंद्रा यांच्या मोबाइलमधील डेटा तपासून पहायला होता. यामध्ये त्यांना व्हॉट्सअपवरील चॅट, कॉल रेकॉर्ड्स, मेसेज, फोटो आणि व्हिडीओ गॅलरी तपासायची होती. मात्र यासाठी राज कुंद्रांनी गुन्हे शाखेकडे दिलेला मोबाइल हा त्यांनी याच वर्षी मार्च महिन्यात विकत घेतल्याचं स्पष्ट झालं. त्यावेळेस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या मोबाइलसंदर्भात विचारणा केली असता नवीन फोन घेतल्यावर जुना फोन आपण काढून टाकल्याचं कुंद्रा यांनी सांगितलं. तेव्हापासून राज कुंद्रा हा नवा मोबाइल वापरत असल्याने या मोबाइलच्या तपासातून पोलिसांना फारसे सबळ पुरावे मिळणार नाहीत असं सांगितलं जातंय.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

या प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांचा जुना फोन हा तपासासाठी अंत्यंत महत्वाचा दुवा होता असं तपास अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. आता राज कुंद्रा यांचा जुना फोन पोलिसांना तपासता येणार नसल्याने त्यांना जुने चॅट, कॉल रेकॉर्ड्स यासारख्या गोष्टींचा तपास करताना अडचणी येणार आहेत. हे पॉर्नोग्राफी रॅकेट ज्या कालावधीमध्ये सक्रीय होतं तेव्हा कुंद्रा वापरत असणारा हा फोन असल्याने तो तपासासाठी फार महत्वाचा होता.

नक्की वाचा >> “राज कुंद्राच्या हॉटशॉट्स App साठी काम केल्याने नवऱ्याने तिला घटस्फोट दिला”

फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई पोलिसांनी या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा पर्दाफाश केला असला तर कुंद्रा यांनी प्लॅन बी तयार ठेवला होता. कुंद्रा यांनी नवीन अ‍ॅपवर काम करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांनी नवीन कंटेट तयार करण्यासही सुरवात केलेली. या नवीन अ‍ॅपचं नावही ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या उद्योगामधून कुंद्रांना चांगला नफा मिळत होता तर त्यांनी हा उद्योग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलीय. कुंद्रा यांनी आधीचा डेटा डिलीट केला आहे. कुंद्रा यांच्या अंधेरीमधील कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा मोठ्या प्रमाणात डेटा डिलीट करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलीस डिजीटल फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तज्ज्ञांच्या मदतीने कुंद्रांनी डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कुंद्रा यांच्या कार्यालयामधील सर्व्हरला दोन ते तीन जणांना अ‍ॅक्सेस देण्यात आलेला. त्यामुळे कार्यालयातील सर्व्हरवरील हा डेटा राज कुंद्रा किंवा या प्रकरणातील दुसरा आरोपी रायक थोरपेने डिलीट केल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आतापर्यंत पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यामधून जवळजवळ १२० अडल्ट चित्रपट आढळून आले. हे सर्व चित्रपट हॉटशॉर्टस या अ‍ॅपच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले.