मुंबई : राजकारणी म्हणून राज ठाकरे जसे सर्वांच्या परिचयाचे आहेत, तसेच ते व्यंगचित्रकार म्हणून सर्वांना माहीत आहेत. त्यांच्यातील कलाकार तितकाच चोखंदळ वाचकही आहे. नुकताच त्यांनी ‘सुख पाहता’ या वसंत कानेटकर लिखित नाटकाच्या पुस्तकासंबंधी एका आठवणीला समाज माध्यमावर उजाळा दिला. खुद्द कानेटकरांच्या आग्रहखातर त्यांनी हे मुखपृष्ठ साकारले होते.

राजकारणात सक्रिय होण्याअगोदर कलाकार म्हणून राज ठाकरे यांची कारकीर्द घडत होती. सुरुवातील ते ‘सामना’ , ‘मार्मिक’ आणि ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे रेखाटत होते. त्याच काळात म्हणजे १९८९ साली ठाकरे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ राज यांच्या घरी आले होते. तेव्हा ते वसंत कानेटकरांचे ‘सुख पाहता’ नाटक करत होते. त्या नाटकाचे पुस्तक व्हावे आणि त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ राज यांनीच रेखाटावे, अशी कानेटकरांनी इच्छा आहे असे वाघ यांनी राज यांना सांगितले. याविषयीची आठवण सांगताना राज ठाकरे लिहितात, ‘मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता, नाटक हा नाट्यानुभव, पण त्याची पुस्तकेही निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.’

आणि असे साकारले मुखपृष्ठ…

कानेटकरांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती असे ठाकरे यांनी लिहिले आहे. यासाठी त्यांनी आधी नाटक पाहायचे आणि मगच मुखपृष्ठ रेखाटायचे, असे मोहन वाघ यांना सांगितले. यासाठी राज यांनी शिवाजी मंदिरात जाऊन ‘सुख पाहता’ हे नाटक पाहिले. त्या नाटकातील कलाकार यशवंत दत्त यांचे ठाकरे मोठे चाहते होते. दत्त यांनी त्या नाटकातून सहा पात्रे उभी केली होती. हा नाट्यानुभव प्रत्यक्ष रंगमंचावर पाहून राज थक्क झाले आणि त्यांनी तात्काळ वाघ यांना आपण मुखपृष्ठ करीत असल्याचे कळविले.

दिग्ग्जांचे आशीर्वाद लाभले

पुस्तकाचे मुखपृष्ठ राज यांनी एका दिवसात तयार केले आणि ते झाल्यांनतर त्यांनी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखविले. ‘मुखपृष्ठ दोघांनाही आवडले. माझ्यासाठी हा तेव्हा मिळालेला आशीर्वाद होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती होती’, असे राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर नमूद केले. ही आठवण त्यांनी नुकताच समाज माध्यमांवर कथन केली. यासोबत त्यांनी ‘सुख पाहता’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्रही जोडले आहे. ‘मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचे पुस्तक घेऊन ते झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे, हीच सदिच्छा’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.