सौदीत मशिदीवरचे भोंगे बंद केले जातात, तर आपल्याकडे मोदी भोंगे का बंद करू शकत नाहीत? उद्याच्या सभेत यावर बोलेन, त्यात अजून काहीतरी येईल, असा सूचक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला.ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच राज्यातील आजचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेले आहे. असले घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. त्यामुळे आताचे राजकारण पाहता, त्यात मी बसत नाही आहे आहे. मात्र हे रोखण्यासाठी तरुणांनी राजकारणात यायला हवे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळय़ानिमित्त आयोजित कलासक्त मनाचे कवडसे या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी राजकारणापासून ते कला क्षेत्रापर्यंत सर्वच गोष्टींवर दिलखुलास मते मांडली.
देशात १९९५ ला इंटरनेट आणि चॅनेल्स आली. जग खुले झाले. त्यातून येथील राजकारण, चळवळीतून सुशिक्षित मध्यमवर्ग बाहेर पडला. याच काळात राज्यातील राजकारणाचा ऱ्हास सुरु झाला. त्यामुळे आज मध्यमवर्ग मुला- मुलींनी राजकारणात यायला हवे. अन्यथा राज्याची अवस्था उत्तर प्रदेश, बिहार सारखी होईल असा इशाराही त्यांनी दिला.आपल्याकडे कलाकारांची कदर नाही. देशातील एकही विमानतळ कलावंतांच्या नावाने ओळखले जात नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.