मुंबई : सत्तेवर बसल्यानंतरही भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही, तर काँग्रेसला अजूनही विरोधी पक्षाची भूमिका कशी बजवायची हे समजलेले नाही. सत्ता केवळ खुर्चीत नसते, ती अंगात आणि मनातही असावी लागते. सत्ताधाऱ्यांनी आपल्यावरील टीका आणि विनोद खिलाडू वृत्तीने स्वीकारायला शिकले पाहिजे. मात्र, आज व्यंगचित्रकार, पत्रकार आणि संपादकांवर बंधने आणली जात आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
पु. ल. देशपांडे यांच्यावरील व्यंगचित्र दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी पु.ल.देशपांडे यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. भाजपकडून संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या काढलेल्या रॅलीवर टीका करत राज ठाकरे यांनी भाजपने लोकशाही वाचवा असे म्हणणे केंटुकी फ्राइड चिकनच्या प्रतीक असलेल्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असे सांगण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वत:च सत्तेत बसलेले असताना लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात, असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी विचारला.
विधान परिषद निवडणुकांच्या निकालाचा अंदाज चुकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, मी आजवर कोणत्याच पंतप्रधानांनी असे ट्विट केल्याचे पाहिलेले नाही. कारण भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतूनच बाहेर आलेला नाही. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय शैलीचाही दाखला दिला. बाळासाहेबांवर अनेक पत्रकार आणि संपादकांनी टीका केली; मात्र त्यांनी प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलेच असे नाही. टीका करणारा प्रत्येकजण आपला शत्रू नसतो, तर तो आपली भूमिका मांडत असतो, हे समजून घेण्याची गरज आहे. टीकेला कसे सामोरे जायचे, हे सत्ताधाऱ्यांनी ठरवायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.
व्यंगचित्रामुळे वर्तमानपत्रातून काढून टाकण्यासारख्या घटना घडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे, असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर व्यंगचित्र काढून त्यांनाच ते पाठवले होते. नेहरू यांनी त्यावर आपली सही देऊन बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या, अशी आठवण सांगितली. त्यामुळे व्यंगचित्रकार, पत्रकार किंवा संपादक हे कोणाचे शत्रू नसतात. ते केवळ आपापली भूमिका मांडत असतात. त्यांचे म्हणणे समजून घेण्याची आणि त्यावर खिलाडूवृत्तीने प्रतिक्रिया देण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे. परंतु, गेल्या दहा-बारा वर्षांत व्यंगचित्रकार आणि पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्याचे जे प्रकार सुरू झाले आहेत, ही संस्कृती विचित्र आणि घाणेरडी आहे. ही बाब आता कळणार नाही, कालांतराने हे सगळे गेल्यानंतर समजेल, असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी केले.
