मुंबई: महाराष्ट्र दिन हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे तसा तो मुंबई घडवण्यात मराठी माणसांनी केलेल्या संर्घषाचे स्मरण करण्याचा आहे. सरकार जसे औपचारिकता म्हणून इतर अनेक दिवस साजरे करते. तसा हा एक सरकारी दिवस म्हणून साजरा केला जातो. हुतात्मा चौकातील स्मारकाला नीट सजावट नसते. सर्वत्र सरकारी अनुत्साह जाणवत होता. हा दिवस सुतकी वातावरणात साजरा केला जातो, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.
सरकारला आणि त्यांच्या विभागांना महाराष्ट्र दिनाबद्दल आलेली अनास्था कशातून आहे? वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्यातील नेत्यांच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला तर वरिष्ठांची खप्पामर्जी होईल. हा भाव सरकार चालवणाऱ्यांच्या मनात आहे का? हा दिवस राज्यातील जनतेसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. तेथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. अशी टीका ठाकरे यांनी केली. हुतात्मा चौकात या दिवशी तीर्थक्षेत्रासारखी गर्दी होणे अपेक्षित आहे. मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरु नये. हुतात्मा चौकाला भेट द्या, आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
